। मुरूड शहर । वार्ताहर ।
गणेशोत्सव नुकताच संपन्न झाला आहे. या काळात चाकरमानी मंडळी मुरूड, काशीद परिसरात आली होती. यामध्ये पर्यटकांचा समावेश फारसा दिसून आला नाही. मोठी वर्दळ असणार्या काशीद या प्रसिद्ध समुद्रकिनार्यावर हंगामातील शनिवारी देखील पर्यटक दिसून आलेले नाहीत. गणेशोत्सवानंतर पर्यटक येतील ही अपेक्षा फोल ठरली असल्याची माहिती येथील स्टॉल धारक संदीप बेलोसे आणि सूर्यकांत जंगम यांनी दिली आहे.
पर्यटन हंगामात काशीद समुद्रकिनार्यावर 500 ते 600 वाहने येत असतात. मात्र, शनिवारी सायंकाळी 60 ते 65 वाहनांतून फक्त 250 ते 300 पर्यटक आल्याची माहिती सूर्यकांत जंगम यांनी दिली आहे. काशीद समुद्रकिनार्यावर सुमारे 50 स्टॉल्स असून 16 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आले आहेत. परंतु, पर्यटकांअभावी पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून अनेकांना वीज बील भरण्यासाठी हाताशी पैसे नाहीत. अशी अवस्थाअसल्याचे जंगम यांनी सांगितले.
जंजिरा जलदुर्ग अजूनही पर्यटकांसाठी बंद आहे.शिवाय काशीद समुद्रकिनार्यावरील बोटिंग देखील अद्याप सुरू नसल्याने पर्यटक येत नाहीत. याचा मोठा परिणाम हॉटेल्स, रेस्ट हाऊसेस, छोटे व्यवसायिक, सुरक्षा जीवरक्षक, घोडेस्वारी, स्टॉल्सधारक यांच्यावर झाला असून मोठी आर्थिक चणचण निर्माण झाली आहे.पर्यटनाचा हंगाम सुरू झाला असतानाही पर्यटकांना भावणार्या ऐतिहासिक वास्तू किंवा करमणुकीची साधने वेळेत सुरू नसतील तर पर्यटक येणार कसे, असा प्रश्न जंगम आणि संदीप बेलोसे यांनी उपस्थित केला आहे.