। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात वाहनाने वासराला धडक दिली. या अपघातात वासरू गंभीर जखमी झाले. या वासराला प्राणी मित्र व येथील व्यापार्यांनी उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवले. परंतु, वासराच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उठता येत नव्हते. यावेळी प्रफुल्ल बेटकर, ज्योती पाडसे, सिस्टर लेपरशी यांनी प्राणी मित्र कुमार देशपांडे यांना फोन करून बोलावून वासराच्या पायावर उपचार करून त्याला जिवदान दिले.
मुंबई-गोवा महामार्गावरील उनाड गुरांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. या उनाड गुरांमुळे प्रवासी जखमी होतात तर वाहनांमुळे गुरे जखमी होत आहेत. याविषयी शांतता कमेटीच्या बैठकीत अनेक वेळा कोलाड पोलिस ठाण्यात प्रफुल बेटकर व चंद्रकांत लोखंडे यांनी विषय मांडला होता. कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि मोहिते यांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी प्राणी मित्र प्रफुल बेटकर यांच्याकडून केली जात आहे.