तुंगी गावावर बिबट्याची दहशत

एकाच रात्री तीन वासरांचा फडशा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या तुंगी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून वन्यजीवांच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. बुधवारी (दि. 4) मध्यरात्री बिबट्याने मानवी वस्तीत शिरून हनुमान सुपे यांच्या गोठ्यातील तीन वासरांचा एकामागून एक फडशा पाडला. या भीषण हल्ल्यामुळे पशुपालक हवालदिल झाले असून, संपूर्ण तुंगी परिसरात दहशत पसरली आहे. बिबट्याच्या या वाढत्या उपद्रवामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

दरम्यान, तुंगी गावातील ग्रामस्थांचा मुख्य उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहे. बुधवारी रात्री गाव शांत झोपलेले असताना बिबट्याने हनुमान सुपे यांच्या घराशेजारील गोठ्यात प्रवेश केला. अत्यंत हिंस्त्रपणे बिबट्याने एकाच वेळी तीन लहान वासरांवर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

तसेच, तुंगी हे गाव निसर्गरम्य असले तरी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून बिबट्याच्या वावरामुळे हे गाव डेंजर झोन बनले आहे. डोंगराळ आणि झाडीझुडपांचा भाग असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते. यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या आणि गायी-म्हशींवर बिबट्याने हल्ले केले आहेत. मात्र, आता बिबट्या थेट घरांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

दरम्यान गावाचा विकास झाला असला तरी बिबट्याच्या दहशतीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. डोंगरदऱ्यातून शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सकाळी लवकर आणि संध्याकाळी अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. महिलांना शेतीकामासाठी किंवा सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जाताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. जर वेळीच बिबट्याचा बंदोबस्त झाला नाही, तर एखाद्या दिवशी मानवावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. वनविभागाने केवळ पंचनामे करून कागदी घोडे नाचवू नये, तर प्रत्यक्ष कृती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. गावात तातडीने सौर दिवे वाढवणे आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version