आज रस्त्यावर आहोत, उद्या कार्यालयात घुसू- विष्णू पाटील
| पेण | प्रतिनिधी |
पेण जीवनवाहीनी समजली जाणारी विक्रम-मिनीडोअर चालक-मालक संघटनेवर पेण नगरपालिकेने बेकायदेशीररित्या थांबा हलवून जो अन्याय चालवला आहे, त्या विरुध्द सोमवारी शिवसेना नेते विष्णू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांसमवेत विक्रम मिनीडोअर चालकांनी आपल्या कुटुंबासमवेत पेण नगरपालिकेवर हजारोंच्या संख्येने धडक मोर्चा काढून संताप व्यक्त केला.
या मोर्चात शेतकरी कामगार पक्ष, शिवेसना, राष्ट्रवादी कॉग्रेस, या पक्षाची नेते मंडळी व विक्रम मिनिडोअर चालकांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सामिल झाले होते. यावेळी मोर्चेकर्यासमोर बोलताना विष्णू पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आज आम्ही रस्त्यावर मोर्चे काढतोय. परंतु, कागदी घोड्यांचा खेळ करून विक्रम मिनीडोअर चालकांचा थांबा हलवणार असाल तर तुमच्या कार्यालयात घुसल्याशिवाय आम्ही राहणार नाही,अशा इशारा दिला. मुख्याधिकारी जनतेसाठी असतात धनदांडग्यांसाठी नाहीत हे लक्षात ठेवावे. असेही ते म्हणाले.
गेली 28 वर्ष हा थांबा आमच्या ताब्यात आहे. पहिल्यांदा 1989 ला त्यानंतर 2008 ला आम्ही नगरपालिकेविरुध्द संघर्ष केले आणि या संघर्षात यश देखील संपादन केले. 2008 ला ज्यावेळी येथील सत्ताधार्यांनी पूर्ण विक्रम स्टॅन्ड मातीने भरले होते. तेव्हा तब्बल अडीच तीन तास रस्ता रोखून सत्ताधार्यांना व प्रशासनाला वठणीवर आणले. त्यावेळी प्रशासनाने मिनीडोअर चालकांना नगरपालिकेमार्फत सुविधा देखील देण्यास सुरूवात केल्या. मग आज असे असताना परस्पर आपण आम्हा विक्रम मिनिडोअर चालकांना बेघर कसे करू शकता.असा सवालही त्यानी उपस्थित केला.
आजचे सत्ताधारी जर विक्रम मिनिडोअर चालकांच्या पोटावर मारण्याचे काम करत असतील यापुढे लक्षात ठेवा गाठ आमच्याशी आहे. कसे सत्तेवर येताय हेच पहातो. जे विक्रम मिनिडोअरने प्रवास करत नाहीत त्यांना आमचे दु:ख काय समजेल. ए.सी.गाड्यातून फिरणार्या लोकप्रतिनिधींना आमची ताकद दाखवून देऊ. – विष्णू पाटील,शिवसेना नेते
यावेळी नगरसेवक संतोष पाटील यांनी भाजी मार्केटचा चोरीला गेलेल्या रस्त्यावर भाष्य केले तर शोमेर पेणकर यांनी सभागृहात विक्रम मिनिडोअर थांब्याच्या ठरावाला झालेल्या विरोधाविषयी भाष्य केले. मंगेश दळवी यांनी जर आमच्या ताटातले घेतलेत तर तुमच्या ताटातून सर्व हिरावून घेतल्याशिवाय राहणार नाही. विक्रम थांबा हा आमच्या उर्दनिर्वाहाचा थांबा आहे.असे सांगितले. यावेळी अशोक मोकल, छाया काईनकर, जगदीश ठाकूर, संजय डंगर, अविनाश पाटील, नंदा म्हात्रे, विजाभाउ पाटील, दयानंद भगत, डी.बी.पाटील आपले मनोगत व्यक्त केले.
मोर्चाला उदंड प्रतिसाद
सकाळी 11:45 च्या सुमारास विक्रम मिनीडोअर थांब्या पासून मोर्चा काढण्यात आला. राजू पोटे मार्गे, पका पाटील चौकातून महावीर रोड, तिनबत्ती नाका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला हार घालून पुढे आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हार घालून नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला. पहिले टोक पकाप ाटील चौकात होत तर दुसरे टोक विक्रम मिनीडोअर थांब्यावर. एवढया मोठया प्रमाणात मोर्चात विक्रम मिनीडोअर चालकांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल, वडखळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक तानाजी दादर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मोर्चाकर्त्यांकडून पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जिवन पाटील यांना निवेदन सादर केले.
आपले म्हणणे वरिष्ठांकडे पाठवू – मुख्याधिकारी
मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आपले निवेदन आमच्या वरिष्ठांकडे (जिल्हाधिकार्यांकडे) व सकारात्मक कसा विचार करता येईल हे ही वरिष्ठांना सांगण्यात येईल जेणेकरुन कोणत्याही प्रकारे विक्रम चालकांवर अन्याय होणार नाही, याचा विचार केला जाईल,असे सांगितले.