| पनवेल | वार्ताहर |
जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी पनवेलमध्ये बुधवारी (दि.21) सकाळी महाविकास आघाडीच्यावतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या तिरंगा यात्रेत महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील व्यक्तीरेखेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.
यात्रेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. तर, पनवेल शहरातून यात्रा काढून काँग्रेस भवन येथे तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत भारत मातेचा जयजयकार करण्यात आला. तसेच, ‘पाकिस्तान मुर्दाबाद-आतंकवाद मुर्दाबाद’ म्हणत दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलीफे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शेकापचे ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, जिल्हा चिटणीस राजेश केणी, अनिल ढवळे, माजी नगरसेवक लतीफ शेख, नगरसेविका शशिकला सिंग आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.