| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील ममदापूर इथे 5 वर्षांपूर्वी सेंट्रल गार्डनचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर गेल्या 5 वर्षात संरक्षण भिंत आणि स्वच्छतागृह पलिकडे उद्यानामध्ये काहीही काम झालेले नाही. तर प्राधिकरण क्षेत्र असलेल्या ममदापूर येथे ना रस्ते, ना गार्डन, आणि सांडपाण्याची देखील व्यवस्था नाही. त्यामुळे याठिकाणी आता सदनिका तयार असून देखील ग्राहक फिरकेनासे झाले आहेत.
कर्जत तालुक्यातील नेरळ, ममदापूर व कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते, बोपेले ही चार गावे नेरळ संकुल विकास प्राधिकरण यात समाविष्ट करण्यात आली होती. नेरळ व परिसरातील गावे यांचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता नगररचना विभागाकडून प्राधिकरणाची निर्मिती 2007 च्या सुमारास करण्यात आली होती. तसेच प्राधिकरणाची निर्मिती करून त्याचा कार्यभार रायगड जिल्हा परिषदेकडे देण्यात आला होता. या प्राधिकरणाच्या माध्यमातून परिसराचा नियोजनबध्द विकास होईल असे नागरिकांना वाटले होते. मात्र प्राधिकरणाची निर्मिती होऊन देखील प्राधिकरण क्षेत्रातील भागाची सुविधांच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे चित्र आहे.
ममदापूर भागाचा होणारा विकास पाहता याठिकाणी गार्डन व्हावे अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार नेरळ विकास प्राधिकरण हद्दीतील ममदापुर गावातील उद्यान बांधण्यासाठी 50 लाख खर्च जिल्हा परिषद करणार होती. नोव्हेंबर 2017 मध्ये या उद्यानाचे भूमिपूजन देखील करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी या उद्यानाच्या निर्मिती साठी 30 लाखाची तरतूद केलेल्या निधीचे पत्र तात्काळ दिले होते. तर यासाठी येथील बांधकाम व्यावसायिक संघटना देखील उद्यानाच्या कामासाठी पुढे सरसावली होती. मात्र 2017 नंतर आज जवळपास 5 वर्षे लोटल्यानंतर देखील येथे उद्यान उभे राहिलेले नाही. तर या 5 वर्षात उद्यानासाठी 20 लाख रुपये खर्चत संरक्षण भिंत, तर 10 लाख रुपये खर्चून शौचालय बांधण्यात आले. मात्र उद्यानाच्या जागेत वाढलेल्या गवतापलिकडे काहीच झालेले नाही. यासह येथील ग्रामपंचायत देखील यासाठी पाठपुरावा करण्यात उदासीन ठरली आहे. तेव्हा याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान परिसरात कोणतीही सुविधा उपलब्ध झाली नसल्याने आता ममदापूर परिसरात इमारती उभ्या राहिल्या असून सदनिका देखील तयार आहेत मात्र त्यासाठी ग्राहकच नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. तेव्हा नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बनवलेले प्राधिकरण सपशेल फसले असल्याने त्याचा फटका बिल्डर सह सदनिका विकत घेणाऱ्या ग्राहकांना देखील बसला असल्याचे चित्र आहे.
ममदापूर ग्रामपंचायत ही नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास आजवर अकार्यक्षम ठरली आहे. तर प्राधिकरण देखील सुविधा देण्यास निष्फळ ठरले आहे. प्राधिकरण क्षेत्रात 4 गावांपैकी सगळ्यात मोठे क्षेत्र हे ममदापूर गावचे आहे. त्यामुळे येथे गृहप्रकल्प उभे राहण्याची संख्या देखील अधिक आहे. असे असताना येथे रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था नाही तर उद्यानाची आवश्यकता असताना भूमिपूजन होऊन सुद्धा गेले 5 वर्ष ग्रामपंचायत आणि प्राधिकरण उद्यान उभे करू शकले नाहीत हे दुर्दैव आहे. त्यामुळे आता येथे बांधकाम व्यावसायिक येण्यास इच्छुक नाही असे चित्र आहे.
: रोशन शिंगे, ग्रामस्थ ममदापूर
ममदापूर येथे उद्यानाचे भूमिपूजन झाल्यानंतर 20 लाख रुपयांचा निधी मंजूर होता त्यानुसार संरक्षक भिंत उभी करण्यात आली तर त्यानंतर 10 लाख रुपयांचा निधी मिळाल्यानंतर शौचालय बांधकाम करण्यात आले. आता पुढील निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध झाल्यावर खेळणी, उद्यान आदि शिल्लक कामे केली जातील.
: सतीश जगताप, कनिष्ठ अभियंता, नेरळ संकुल विकास प्राधिकरण
नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रात इमारत बांधकाम करताना विकासकाला विकास कर भरावा लागतो. यासह कामगार कल्याण निधी आदी पैसे भरावे लागतात. प्राधिकरणाकडे निधी असताना आजवर ममदापूरमध्ये विकासकामे हवी तशी झालेली नाहीत. तर नियोजन अजिबात नाही. उद्यान विकसित करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता. मात्र प्राधिकरणाकडून येथे सुविधा नाहीत तर आम्ही बाकी काम करायची कशी ? आज बिल्डर येथे काम सुरू कशी करायची या विचारात आहेत. त्यामुळे याभागात अगोदर विकासकामे होणे महत्त्वाचे आहे.
: शाकीब पालटे, बांधकाम व्यावसायिक ममदापूर







