अतिक्रमणे हटवूनही परिस्थिती जैसे थेच
| माणगाव | सलीम शेख |
माणगाव शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरील दुतर्फा असलेली अनाधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामे, टपरीधारक, हातगाड्या नगरपंचायतीने हटविण्यात आल्या. तरीही माणगाव शहरातील वाहतूक कोंडी कायम राहिली आहे. अशा प्रकारे वाहतूक कोंडी सुरळीतपणे करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, सामान्यांना आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे सर्व उपाय आणि प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. यावर रामबाण उपाय म्हणजे बायपास तातडीने करणे हा आहे. मात्र, आता पावसाळा सुरू झाल्याने हा बायपास होण्याची उरलीसुरली आशादेखील मावळली आहे. त्यामुळे यावर्षीही शहरातील वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.
माणगाव शहरातील वाहतूक कोंडी सुरळीतपणे होण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात दोनदा बैठका झाल्या. त्या बैठकीत विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या. परंतु, त्या काही अंशी अंमलात आल्या. त्यानंतर दोन दिवस रस्त्यावरील टपरीधारक आणि हातगाड्या नगरपंचायतीने हटविल्या. परंतु, हे सर्व उपाय प्रचंड रहदारीमुळे अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढतच चालली आहे. जोपर्यंत माणगाव आणि इंदापूर बायपास होत नाही, तोपर्यंत अपघातात नाहक बळी जात राहणार आहेत. तसेच माणगावातील नागरिक आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
पावसाळ्यात महामार्ग कालवा मार्ग ते मोरबा रोड हा अंतर्गत रस्त्यांसाठी शासनाने वेळेवर निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे हा बहुपर्यायी मार्ग पूर्णपणे अर्धवट अवस्थेत असल्याने बंद राहणार आहे. या रस्त्यावरून अंतर्गत मार्गाने मुंबई, पुणे आणि श्रीवर्धन, हरिहरेश्वर, म्हसळा या ठिकाणी शहरातील बाजारपेठेतून न जाता ये-जा करण्यासाठी शॉर्टकट होता. परंतु, तोही एकमेव मार्ग बंद होणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडीवर अधिकचा ताण वाढतच जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना महामार्गावरून जाताना जीव मुठीत धरूनच बाजारहाट करण्यासाठी जावे लागणार आहे. पावसाळ्यात फक्त बाजारपेठेतील महामार्गावरच अवलंबून राहावे लागणार आहे.
जून महिन्यात सर्व शाळा आणि कॉलेज सुरू आहेत. माणगाव शहरातील विविध शाळा कॉलेजमधून सुमारे 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर मोठा दुष्परिणाम होऊन अनेक वेळा वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात अंतर्गत कचेरी रोड, निजामपूर रोड, बामणोली रोड, मोरबा रोड हे चार प्रमुख मार्ग नेहमीच रहदारीने गजबजलेले असतात. हे रस्ते खूप अरुंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक रहदारी आणि नागरिकांची गर्दी होत असते. त्यात विद्यार्थ्यांचीही भर पडणार असल्याने वाहतूक कोंडीत माणगावकरांचे मोठे हाल सोसावे लागणार आहेत.
माणगाव पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी वर्ग अपुरा आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांवर प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण वाढतच आहे. वारंवार मागणी करूनही पोलीस कर्मचारी यांची क्षमता वाढवत नसल्यामुळे वाहतूक कोंडीवर दुरगामी परिणाम झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने बरेच जण वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवून कुठेही आणि कसेही करून वाहने पुढे रेटत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. महामार्गावरील रेल्वे स्थानक, ढालघर फाटा, दत्त नगर, कालवा मोरबा रोड, विकास कॉलनी कॉर्नर, बामणोली रोड येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
माणगावचा बायपास झाल्यास वाहतूक कोंडी सुरळीतपणे होईल. त्याचबरोबरीने अपघातावर आळा बसेल. माणगावातील नागरिक मोकळा श्वास घेऊ शकतील. नागरिक आणि विद्यार्थी चालणे सोयीस्कर होईल. व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार यांच्या धंद्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत होऊन वाढ झालेली दिसून येईल. मात्र, माणगावातील बायपास तातडीने करण्याची कोणत्याही पुढाऱ्यांनी प्रयत्न किंवा सभा बोलावलेली दिसत नाही. त्यांची अनास्था आणि नाकर्तेपणा वाहतूक कोंडीच्या मुळावर आल्याने नागरीकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. नेते काहीच करीत नाही. परंतु, माणगावातील नागरीक हतबल झाले आहेत. बायपासला वाचा फोडण्यासाठी मोर्चा काढणे आवश्यक आहे. मात्र, ते केवळ समाज माध्यमातून फुशारक्या आणि वल्गना करत आहेत. प्रत्यक्षात मुग गिळून गप्प बसले आहेत. मात्र, याचे दुष्परिणाम पुढील पिढीला भोगावे लागणार आहेत, हे मात्र नक्की, असा इशारा वयोवृद्ध नागरिकांनी दिला आहे.