सर्दी, खोकळ्याचे रुग्णदेखील वाढल्याची डॉक्टरांची माहिती
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
वातावरणात अनपेक्षितरित्या झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकळ्यासोबतच व्हायरल फिवर (विषाणूजन्य ताप) च्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती डॉ. सुयोग पाटील यांनी दिली. डॉ. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन ते तीन दिवसांत सर्दी, खोकळा आणि व्हायरल फिवरवर उपचारासाठी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दीत वाढ होत असल्याने आजाराची लागण होऊ नये याकरिता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वातावरणातील तापमान प्रचंड वाढले असताना काही दिवसापासून अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा आणि जमिनीत काही प्रमाणात पाणी मुरलेले असले तरी हेच मुरलेले पाणी आता वाफ होऊन वातावरणात आणखी उष्णता निर्माण करणार आहे. अवकाळी पावसाने आलेला गारवा आणि त्यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे आजारांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, नागरिकांनी घाबरून न जाता अधिक सजक राहायला पाहिजे, असे आवाहन कळंबोली येथील डॉ.सुयोग पाटील यांनी केले आहे.
संभाव्य आजार
उलट्या, जुलाब, सर्दी, खोकला, व्हायरल फिवर, दम लागणे, श्वसनाचे आजार, घामोळ्या, त्वचा लाल होणे, डोळ्यांची जळजळ आदी.
अशी घ्या काळजी
पाणी उकळून प्यावे, वेळेवर जेवावे, सकस साधा आहार घ्यावा, फ्रीजमधील शिळे अन्न खाऊ नये, भरपूर पाणी पीत राहावे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.