| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटनस्थळी येणारे पर्यटक विविध प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटनासाठी जात असतात. त्यांच्याकडे असलेले खाऊचे रॅपर आणि प्लास्टिक बॉटल तसेच पावसाळा असल्याने वापरले जाणारे रेनकोट हे जंगल भागात कुठेही फेकले जात आहेत. दरम्यान, या प्लास्टिक कचऱ्याकडे माथेरान नगरपरिषदेचे लक्ष नसल्याने जंगल भागात असे प्लास्टिक ही जंगलाचा ऱ्हास करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे पालिकेने कचराकुंडीत कचरा टाकण्यात यावा, असे आवाहन करणारे फलक शहरात आणि जंगल भागात लावावेत. असे आवाहन पर्यावरण प्रेमींकडून केले जात आहेत.
माथेरानामधील सर्व प्रेक्षणीय स्थळे ही शहराच्या बाजारपेठ भागापासून काही किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी जाण्यास निघताना सोबत खाऊ तसेच शीतपेय आणि पाण्याच्या बॉटल सोबत घेऊन निघतात. मात्र, ते प्लास्टिक माथेरानचे जंगल विद्रूप करण्यास कारणीभूत ठरत आहेत. पावसात भिजण्यासाठी आलेले पर्यटक हे माथेरानमध्ये आल्यावर प्लास्टिक पासून बनवलेले वापरा आणि फेकून द्या असे रेनकोट विकत घेतात. पन्नास शंभर रुपयांची किंमत असलेले ते रेनकोट पर्यटक दोन-तीन दिवसांची सहल झाल्यावर रस्त्याच्या कडेला फेकून देतात. त्याचवेळी जंगल भागात फिरत असलेले पर्यटकसोबत घेऊन जाणाऱ्या पाण्याच्या बॉटल आणि खाऊचे रॅपर हे त्यांचा वापर झाल्यावर जागा मिळेल तेथे टाकून देत आहेत. त्याचा मोठा परिणाम शहराचे विद्रुपीकरण होण्यास होत आहे. त्यामुळे जंगल भागात सध्या प्लास्टिक व रेनकोटचा खच दिसून येत आहे. त्यामुळे शहराचे प्लास्टिकीकरण झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी पालिकेने सीसीटिव्ही कॅमेरे जंगल भागात बसवावेत आणि त्यातून कचरा जंगलात टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.






