| अकोला | वृत्तसंस्था |
शहरातील खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचे मुंडन करीत तिच्यावर अमानवीय लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्याचप्रमाणे कैलासटेकडी स्मशानभूमी परिसरात या पिडितेला विवस्त्र करीत तिची धिंड काढण्याचा प्रयत्नही झाला आहे. याप्रकरणी खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरे उर्फ गणीभाईला अटक करीत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील कैलास टेकडी भागात परिसरात गुंड गणेश कुमरे याची दहशत आहे. पिडीत मुलीचे वडील मजुरी करतात. तिला एक मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे. गेल्या दोन वर्षांपासून या गुंडाने सातत्याने दहशत माजवत मुलीवर सातत्याने अत्याचार केले. मात्र, दोनदा पोलिसात जाण्याचा प्रयत्न करूनही पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे निर्ढावलेल्या गावगुंडाने या मुलीचे अख्खं आयुष्यच बर्बाद केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बुधवारी आणि गुरूवारी गणेश नामक गुंडाने हैदोस घालत मुलीवर अनन्वित अत्याचार केला. शुक्रवारी या प्रकरणाची माहिती स्त्री चळवळीतील नेत्या आणि वंचितच्या प्रदेश महासचिव अरूंधती सिरसाट यांना मिळाली आणि या प्रकरणाला वाचा फुटली. मात्र, अकोल्यातील खदान पोलिसांनी हे प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळल्याचा आरोप सिरसाट यांनी अकोला पोलिसांवर केला आहे. पिडीत मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. सध्या अकोला पोलिसांची यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. समाजातील नेत्यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि मुलीचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या अगोदर सुद्धा अकोला पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षणामुळे 19 वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागला होता. जिल्ह्यातील पातुरामध्ये तरुणीचा गळा आणि हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळूला होता. तिच्यावर अत्याचार करून तिला ठार मारण्यात आले होते. या प्रकरणात एका आरोपीला अटकही झाली होती. पोलिसांनी हे प्रकरण देखील असंवेदनशिलपणे हातळल्याचा आरोप त्यावेळी झाला होता.