वाहनचालकांची रखडपट्टी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मुंबई – गोवा महामार्गचे रखडलेले काम सुरु व्हावे, कोकणातील रस्ते खड्डे मुक्त व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने कोकण जागर यात्रा रविवारी 27 ऑगस्ट रोजी पनवेलमधील पळस्पे फाटा येथून सुरू करण्यात आली. यावेळी मनसे नेतेे अमित ठाकरे यांनी सरकारचा निषेध करीत सदरचे आंदोलन हे शांततेत असून पुढील आंदोलने उग्र होतील. असा इशारा देखील दिला. या आंदोलनात शर्मिला ठाकरे यांनी देखील 16किमी अंतर पायी चालत पार पाडले.
मात्र रखडलेल्या या मार्गासाठी केलेल्या आंदोलनामुळे यावेळी झालेल्या वाहतूक कोंडीने प्रवासी व वाहनचालकांची रखडपट्टी झाली. सकाळी सात वाजल्या पासून पळस्पे ते कर्नाळा अभयारण्य मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या 5 ते 6 किमीचे अंतर कापण्यासाठी वाहनांना दीड ते दोन तास लागले. याबरोबरच पेण, नागोठणे येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी मनसे कार्यकर्ते पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदत करत होते. नागोठणे वाकण रोडवर आमदार राजू कदम यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत निदर्शने केली. याबरोबरच पेण, नागोठणे, वाकण, इंदापूर या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला मनसेचे झेंडे फडकत होते. शिवाय पदाधिकाऱ्यांचे मोठे छोटे बॅनर सुद्धा मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. अनेकजण रिल्स व व्हिडीओ बनवत होते, तर काही जण आवर्जून फोटो काढत होते. अनेकांनी सोबत फलक आणले होते. कोकणवासियांसाठी, हक्कासाठी हा लढा उभारला गेला आहे. मात्र या आंदोलनात पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. शिवाय प्रवासी व वाहनचालक यांचा खोळंबा झाला. त्यामुळे या आंदोलनाला यश येऊन लवकर महामार्गाचे काम चांगल्या प्रकारे होवो असे अनेकांचे म्हणणे आहे.