13 वर्षीय श्रेयसचा अपघाती मृत्यू
| चेन्नई | वृत्तसंस्था |
ज्या खेळावर जीवापाड प्रेम केलं, जीव तोडून मेहनत केली तीच मोटारसायकल रेसिंग स्पर्धा 13 वर्षीय कोप्पाराम श्रेयस हरीश या उदयोन्मुख खेळाडूसाठी जीवघेणी ठरली. शनिवारी चेन्नईच्या मद्रास आंतरराष्ट्रीय सर्किटवर झालेल्या इंडियन नॅशनल मोटारसायकल रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यातच झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने श्रेयसला आपला जीव गमवावा लागला. अवघ्या 13 व्या वर्षीच रेसिंग ट्रॅकवर श्रेयसच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने या वेगवान शर्यतींच्या खेळावर शोककळा पसरली. श्रेयसच्या मृत्यूनंतर मद्रास मोटर्स स्पोर्ट्स क्लबने उर्वरित शर्यतच रद्द करण्याचा निर्णय घेतला.
या मोसमात त्याने ‘पेट्रोनास वन मेक’ अजिंक्यपदाच्या रुकी प्रकारात भाग घेत राष्ट्रीय स्तरावरील चार शर्यतींसह अनेक शर्यती जिंकण्याचा कारनामा केला होता. मात्र, शनिवारी हाच शर्यतींचा खेळ त्याच्या जीवावर बेतला. शर्यत सुरू होताच तिसऱ्या टप्प्यात श्रेयसच्या बाईकला अपघात झाला आणि तो ट्रॅकवर गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ ट्रॅकवर सज्ज असलेल्या ट्रॉमा केअर ॲम्ब्युलन्सच्या मदतीने रुग्णालयामध्ये हलवण्यात आले, पण दाखल करताच त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याप्रसंगी त्याचे वडीलही त्याच्यासोबत होते.
यावर्षी त्याने ‘मिनीजीपी इंडिया’चे जेतेपद पटकावल्यानंतर स्पेनच्या मिनीजीपी शर्यतीतही भाग घेतला होता. स्पेनमध्ये झालेल्या दोन्ही शर्यतींत तो चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिला होता. तसेच त्याला याच महिन्यात मलेशियात होणाऱ्या सेपांग सर्किटमध्येही सीआरए मोटरस्पोर्ट्चे प्रतिनिधित्व करायची संधी होती. श्रेयसच्या आधी याच ट्रॅकवर 59 वर्षीय केई कुमार या प्रसिद्ध रेसरचा अपघातात मृत्यू झाला होता.