पहिल्या सामन्यात पंड्याची अनुपस्थिती
। मुंबई । प्रतिनिधी ।
बहुप्रतिक्षित आयपीएलचा 18 वा हंगाम येत्या 22 मार्चपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर स्पर्धेच्या दुसर्या दिवशीच आयपीएलमधील एल क्लासिको सामना म्हणजेच मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. परंतु, मुंबईच्या पहिल्याच सामन्यात संघाचा कर्णधार मैदानाबाहेर असणार आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्याचे नेतृत्व सुर्यकुमार यादव करणार असल्याचे हार्दिकने सांगितले आहे.
मुंबई इंडियन्स संघाची स्पर्धेपूर्वीची पत्रकार परिषद बुधवारी (दि.19) पार पडली. या पत्रकार परिषदेसाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षक महेला जयवर्धने उपस्थित होते. यादरम्यान हार्दिकने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच, पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्त्व कोण करणार हे देखील त्यानेच सांगितले. आयपीएल 2024 मधील अखेरच्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे हार्दिक पंड्या आयपीएल 2025च्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे हार्दिकने पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्त्व करणार आहे. कारण सूर्यकुमार यादव भारतीय संघाचेही नेतृत्त्व करतो, त्यामुळे आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व देखील तोच करेल, असे पंड्याने सांगितले.
कर्णधारांचा संघ
मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2025 च्या महालिलावापूर्वी संघातील मुख्य खेळाडूंना रिटेन केले. ज्यामध्ये जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. या पाचही खेळाडूंनी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला कर्णधारांचा संघ म्हटले आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे भारतीय संघाचे कर्णधार आहेत. तर, हार्दिकने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये संघाचे नेतृत्त्व केले आहे. याशिवाय तिलक वर्माने इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत भारताचे नेतृत्त्व केले होते.
मुंबईचा संघ
सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, बेवन जेकब्स (सर्व फलंदाज), हार्दिक पांड्या, नामन धीर, राज अंगद बावा, दीपक चहर (सर्व जलदगती अष्टपैलू), विल जॅक्स, मिचेल सँटनर (दोघेही फिरकी अष्टपैलू), रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ, कृष्णन श्रीजित (सर्व यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, रीसे टॉपली, कॉर्बिन बॉश, सत्यनारायण राजू, अर्जुन तेंडुलकर (सर्व जलदगती गोलंदाज), कर्ण शर्मा, मुजीब उर रहमान, विघ्नेश पुथूर (सर्व फिरकी गोलंदाज)