सर्व पक्षीय बहुजन समाज संघटनेच्या बैठकीनंतर रविंद्र मोरे यांची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील तरुणीच्या हत्याप्रकरणी सरकारी वकील म्हणून ॲड. प्रसाद पाटील यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. ही मागणी समाजसेवक, अनुसूचित जातीचे प्रतिनिधी सदस्य रविंद्र मोरे यांनी केली आहे.
रवींद्र मोरे यांनी नुकत्याच एका बैठकीमध्ये माणगाव तालुक्यातील विविध समस्यांचे प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये माणगाव राष्ट्रीय मार्गावरील विविध समस्या मांडल्या. तसेच, लोणेरे येथील तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या आरोपीला रायगड पोलिसांनी आठ दिवसात जेरबंद केले. या आरोपीला कठोर शिक्षा म्हणून त्याला फाशी व्हावी. पीडित मुलीच्या कुटुंबाला शासनाने सर्व मदत करावी. समाजकल्याण विभागाने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व घरकुल आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी केली. तरुणीच्या हत्याकांड प्रकरणातील मुलीच्या आई-वडिलांना न्याय मिळण्यासाठी शासनाने सरकारी वकील म्हणून ॲड. प्रसाद पाटील यांना सरकारी खर्चाने नियुक्ती करावे, अशी मागणीही रविंद्र मोरे यांनी केली.
गोरेगाव विभाग सर्व पक्षीय बहुजन समाज संघटनेच्या नुकत्याच झालेल्या सभेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने रविंद्र मोरे यांनी याबाबत खासदार सुनील तटकरे यांना निवेदन दिले. अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वकील म्हणून काम करणारे ॲड .प्रसाद शांताराम पाटील यांनी अलिबाग येथील न्यायालयामध्ये सुमारे अठरा वर्षे जिल्हा सरकारी वकील म्हणून दिर्घकाळ काम केले आहे. त्यांना सरकारी वकील म्हणून कामकाज चालवण्याचा खूप मोठा अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या काळात गोरेगाव येथील कांबळे जळीत हत्याकांड, तसेच दिवे आगर येथील सुवर्ण गणपती दरोडा व असंख्य हत्याकांड तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक बहुचर्चित फौजदारी खटल्यांचे कामकाज चालवून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात सहभाग ठेवला आहे. पल्लवी मोरे खून मध्ये प्रथमपासूनच तपासाच्या कामामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.







