| कर्जत | वार्ताहर |
कर्जत शहरातील राधा कृष्ण मंदिरात सूरताल म्युझिकल ग्रुपने संगीत अभांगवाणीच्या माध्यमातून गीते सादर करून उपस्थित संगीत प्रेमींना मंत्रमुग्ध केले. यावेळी शिवलाल गुप्ता यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूर्यकांत गुप्ता यांनी प्रास्ताविकात राधा कृष्ण मंदिर परिसराची माहिती देताना गोशाळा कशा प्रकारे सांभाळली जाते हे सांगितले.
सूरताल म्युझिकल ग्रुपच्या गायकांनी अभंगवाणीचा शुभारंभ केला. रुपेश देशमुख, हर्षदा पाटील, वैभव देशमुख या गायकांनी ओमकार स्वरुपा या गणेश स्तवनाने मैफलीस सुरुवात केली. त्यानंतर राम रामा छंदी, माझे माहेर पंढरी, कानडा राजा पंढरीचा, सजादो घरको, साई तेरा नाम है आदी अभंग व भक्तिगीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कल्पेश मसणे यांनी तबल्यावर, प्रज्ञेश कदम यांनी ढोलकवर तर की बोर्डवर भूषण चव्हाण आणि शुभम चव्हाण यांनी साथ संगत दिली. याप्रसंगी सुनील गोगटे, राजेश भगत, नितीन परमार, मोहन ओसवाल, बाळा गुप्ता, महेश म्हात्रे आदींसह कर्जतकर उपस्थित होते.