। उरण । वार्ताहर ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव ठाकरे सरकारने पारित केला होता. या पाठोपाठ महायुती सरकारनेदेखील दि. बां.च्या नावाने ठराव नव्याने पारित केला होता. मात्र, या घडामोडीला दोन वर्षाचा कालावधी उलटूनही यावर अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण कधी होईल असा सवाल जनता करीत आहे. यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नामकरणाचे वादळ घोंगावत रहाणार आहे.
विमानतळाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोने पारित केल्यानंतर नामकरणाच्या वादाला सुरुवात झाली होती. यादरम्यान शिवसेना विरुद्ध प्रकल्पग्रस्त असा काही काळ संघर्षदेखील झाला. मात्र, शेवटी ठाकरे सरकारनेदेखील दि.बां.च्या नावावर ठराव करून या वादावर पडदा टाकला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ठाकरे सरकारने घेतलेला नामकरणाचा ठराव रद्द करून तो पुन्हा नव्याने पारीत केला होता. त्याला जवळपास 2 वर्षांचा अवधी उलटूनही नामकरणाचे घोंगडे आजतागायत भिजत पडले आहे. यावरून नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळास कोणाचे नाव मिळणार, हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नामकरण कोणाच्या नावे होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विमानतळाचे नामकरण गुलदस्त्यात
