पॉवरलिफ्टींग स्पर्धेत दुसरा क्रमांक
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शेलू गावातील तरुणी आणि नेरळ येथील मातोश्री टिपणीस महाविद्यालयाची विद्यार्थीनी अमृता ज्ञानेश्वर भगत हिने राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रुपेरी कामगिरी केली आहे. राज्य स्पर्धेत सुपर पॉवर वुमन ठरलेल्या अमृता हिने केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत क्लासिक गटात दुसरा क्रमांक मिळवून नाव उंचावले आहे.
राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग गटाची राष्ट्रीय स्पर्धा केरळ राज्यात पार पडली.राष्ट्रीय स्तरावरील ज्युनियर,सब ज्युनियर,सिनियर आणि मास्टर या स्पर्धेतील पुरुष आणि महिला गटाची राष्ट्रीय स्पर्धा केरळ राज्यातील अल्लेपूझा या शहरात 9 ते 11 एप्रिल या दरम्यान पार पडली. महाराष्ट्र राज्याचे क्लासिक गटात नेतृत्व करणार्या कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील शेलू गावची रहिवासी असलेली अमृता हिने राष्ट्रीय स्पर्धेत रुपेरी कामगिरी केली.नेरळ येथील मातोश्री टिपणीस महाविद्यालयात शिक्षण घेऊन आंतर महाविद्यालय, जिल्हा,कोकण विभाग आणि राज्य स्तरावर पॉवर लिफ्टिंगच्या क्लासिक गटात सतत सुपर पॉवर वूमन ठरलेली अमृता हिने राज्य स्तरीय स्पर्धा जिंकून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी निश्चित केली होती.केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अमृता ही क्लासिक गटात दुसर्या क्रमांकावर राहिली.विक्रांत गायकवाड आणि विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली काही वर्षे तयारी करीत असलेली अमृता ही राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी पासून एक पाऊल मागे राहिली.केरळ राज्याची नित्या सुरेश ही क्लासिक गटात देशाची सुपर पॉवर वुमन ठरली तर महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करीत असलेली अमृता भगत ही दुसर्या क्रमांकावर राहिली.उडीसा राज्याची धणीमानी तुडू ही तिसर्या क्रमांकावर राहिली.
दरम्यान,राष्ट्रीय स्पर्धेत क्लासिक गटात महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारी अमृता ही देशातील स्पर्धकांमध्ये दुसर्या क्रमांकावर राहिली आहे.त्याबद्दल राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी अमृता हिचे दूरध्वनी द्वारे संपर्क करून अभिनंदन केले आहे.तर कर्जत तालुक्यातील अमृता वर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून आशियाई स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.