| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
याचना नहीं, अब रण होगा! जीवन-जय, या कि मरण होगा! दुर्योधनाच्या अहंकारापुढे काहीच चाललं नसल्याने श्रीकृष्णाने दुर्योधनला हा इशारा दिला आणि पुढे महाभारत घडलं. आताही तसंच काहीसं घडण्याची शक्यता आहे. पण, यावेळी पांडव-कौरव आमनेसामने नाहीत, तर ते आहेत भारत आणि पाकिस्तान. भारतीय लष्कराने एक पत्रकार परिषद घेत राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘रश्मिरथी’ कवितेचा आधार घेतला आणि पाकिस्तानला इशारा दिला. यापुढे चर्चेचं गुर्हाळ थांबणार आणि पाकिस्तान, त्याच्या दहशतवादाला थेट भिडून नष्ट करणार, असे स्पष्ट संकेत भारतीय लष्कराने दिले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत त्याच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यानंतरही भारताचे ऑपरेशन सिंदूर सुरुच असणार, असं भारताने स्पष्ट केलं. त्याचीच माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराने एक पत्रकार परिषद घेतली.
भारताचे एअर मार्शल ए.के. भारती यांनी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेतील एका ओळीचा संदर्भ दिला. याचना नहीं, अब रण होगा! जीवन-जय, या कि मरण होगा! असं म्हणत त्यांनी भारतीय लष्कर आता पाकिस्तानला पूर्ण सामर्थ्याने उत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलं.
आमचा लढा दहशतवाद्यांशी होता. आम्हाला पाकिस्तानी वायुदलावर हल्ला करायचा नव्हता, पण पाक लष्कर दहशतवाद्यांच्या मदतीसाठी उतरला असं भारतीय वायुदलाचे एअर मार्शल ए.के.भारती म्हणाले. भारताच्या वायुदलाला जराही हानी पोहोचलेली नाही, आपले सर्व वायुदल तळ आणि तिथली यंत्रणा कार्यान्वित आहेत, असंदेखील एअर मार्शल भारती म्हणाले.
हॉटलाईनवरुन डीजीएमओंची चर्चा
युद्धविरामाच्या घोषणेनंतर दि. 12 मे रोजी भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ चर्चा करणार होते. त्याप्रमाणे त्यांची सोमवारी दुपारी चर्चा होणार होती. मात्र, या चर्चेची वेळ पुढे ढकलण्यात आली होती आणि ही चर्चा संध्याकाळी पूर्ण झाली. हॉटलाईनवरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी एकमेकांशी चर्चा केली. दरम्यान, युद्धाची खुमखुमी असणार्या पाकची पुरती जिरली असल्याने काहीसा नरमला असल्याचे पाहायला मिळाले. यापुढे कोणत्याही प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही, अशी मोठी ग्वाही चर्चेवेळी पाकिस्तानकडून देण्यात आली. दरम्यान, दोन्ही देशांच्या डीजीएमओंच्या चर्चेंदरम्यान पीओके, दहशतवादाच्या मुद्द्याशिवाय इतर कोणतीही चर्चा होणार नसल्याचे सांगण्यात आले होते.