आत्करगांव ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
। खोपोली । प्रतिनिधी ।
जैविक कचर्याची विल्हेवाट लावणारा प्रदूषणकारी एसएमएसएन कारखाना मुंबईतून आत्करगाव येथे येणार आहे. मानवी स्वास्थ्याला घातक असणारा कारखाना साजगांव पंचक्रोशीत नकोच या मागणीसाठी सुरुवातीपासूनच ग्रामस्थ विरोध करत आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करू असा आक्रमक पवित्रा स्थानिक ग्रामस्थांनी घेतला असून ग्रामस्थांची खरी ताकद 17 तारखेच्या जनसुनावाणीत दाखवून देणार असल्याचा इशाराही दिला आहे.
हा जैविक प्रकल्प उभारल्यास कुजलेल्या कचर्यामुळे हवा दुषित होवून दुर्गंधी पसरले, तसेच जंतू पाण्यात मिसळल्यास नदी तलाव दुषित होवून नदीवरील पाणी योजना दुषित होऊन साथीच्या आजारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी विरोध दर्शविताच दि.13 ऑगस्ट रोजीची जनसुनाणी रद्द करण्यात होती. परंतु पुन्हा दि.17 नोव्हेंबर जनसुनावणी जाहीर होताच स्थानिक ग्रामस्थांनी खा.सुनिल तटकरे, आम.जयंत पाटील यांच्या समक्ष भेट घेवून सदर घटनाक्रम सांगितल्यावर जिल्हाधिकारी, मा.आम सुरेश लाड यांनीही निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान रविवारी (दि.14)नियोजित कंपनीच्या फाटकासमोर ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली. यावेळी ग्रामस्थ संतोष पाटील, चंद्रकांत देशमुख अशोक मोरे, योगेश देशमुख यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केल्यावर माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी एसएमएसएन कारखान्याच्या होणार्या जनसुनाणी दरम्यान मोठा विरोध करणार असल्याचा इशारा दिला आहे.







