। धाटाव । प्रतिनिधी ।
बहुजन समाजासह अखंड मराठा समाजाच्या हितासाठी अविरत झटणारे, सकल मराठा आरक्षणाचे खंदे पुरस्कर्ते, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे रविवारी (दि.14) अपघाती निधन झाले. मराठा आरक्षणासाठी झटणारा लोकनेता हरवला, अशी समस्त मराठा समाजाची भावना झाली. अशा लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी रोह्यात रविवारी (दि.21)जिल्हास्तरीय शोकसभेचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत गुरुवारी (दि.18) शासकीय विश्राम सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी रोहा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख, उपाध्यक्ष नितीन परब, परशुराम चव्हाण, सुहास येरुणकर, संदीप सावंत, निलेश शिर्के, सूर्यकांत मोरे व विविध विभागातील मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, लोकनेते विनायकराव मेटे यांना आदरांजली वाहण्यासाठी जिल्ह्यातून विविध समाजाचे नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती रोहा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी दिली आहे. रविवारी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ नागरिक सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.