| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील तरुणीवर अत्याचार प्रकरण ताजे असतानाच पनवेल बसस्थानकही महिलांसाठी असुरक्षित असल्याचा प्रकार समोर आला आहे. संध्याकाळ होताच पनवेल एसटी आगार परिसराचा ताबा चरसुले आणि गर्दूले घेत असून, देहविक्री करणार्या महिलांचा वावरदेखील आगार परिसरात वाढत आहे. त्यामुळे पनवेल एसटी आगार महिलांसाठी सुरक्षित आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्वारगेट एसटी आगारात बसची वाट पाहात बसलेल्या एका 26 वर्षीय तरुणीला गाठत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे राज्यात एकट्याने प्रवास करणार्या महिला सुरक्षित आहेत का, असा सवाल उपस्थित होत असतानाच मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या पनवेल एसटी आगाराची समीक्षा केली असता, सायंकाळच्या वेळेत देहविक्री करणार्या महिला तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणार्यांचा आगार परिसरात असलेला खुला वावर पाहता स्वारगेटसारखी घटना पनवेल आगारात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पाहायला मिळाले.
पुनर्विकासाच्या नावावर पनवेल एसटी आगाराच्या डेमोलेशन्सचे काम सध्या सुरु आहे. अनेक वर्षे रखडलेल्या या कामामुळे आगारात विविध समस्या भेडसावत आहेत. अशातच आगारात निर्माण झालेल्या असुविधांचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत असून, महिला प्रवाशांच्या सुविधेसाठी आगारात उपलब्ध करून देण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाबाहेर देहविक्री करणार्या महिलांचा असलेला वावर आगारात येणार्या महिला प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
चरसुल्यांचा वावर
राज्यात प्रवास करणार्या एसटी बससाठी महत्त्वाचा थांबा असलेल्या पनवेल एसटी आगार परिसरात मोठ्या संख्येने बेघर व्यक्तींचा वावर आहे. बेघर असलेल्या या व्यक्ती नशेच्या आहारी गेलेल्या पाहायला मिळत असून, नशेच्या धुंदीत आशा व्यक्तींकडून गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याने प्रशासनकडून आशा व्यक्तींचा वेळीच बंदोबस्त होणे अपेक्षित आहे.
आगारात बेवारस वाहने
एसटी आगारात जवळपास 95 बेवारस वाहने उभी आहेत. यामध्ये एसटी बस, मिनी बस, टेम्पो आदी वाहनांचा समावेश आहे. परिवहन विभागाने जप्त केलेल्या या वाहनांची विल्हेवाट लावणे आवश्यक असताना वर्षानुवर्षे ही वाहने याच ठिकाणी पडून आहेत. संबंधित वाहने हटविण्याच्या दृष्टीने 15 एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली असल्याची माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली आहे.
पोलिसांची गस्त गरजेची
सायंकाळच्या वेळी खासगी वाहनचालक तसेच काही रिक्षाचालक आपली वाहने आगार परिसरात अडोशाला उभी करून मद्यपान करत असल्याचे दिसून येते. अशा वेळी स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवणे गरजेचे आहे.
परिवहनमंत्र्यांच्या आदेशानंतरही परिस्थिती जैसे थे
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी 26 डिसेंबर रोजी पनवेल आगाराला भेट दिली होती. या भेटीदरम्यान ठिकठिकाणी अस्वच्छता, भंगार वाहने यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार जप्त केलेली वाहने दुसर्या ठिकाणी हलविण्यात आली आहेत. तसेच ही वाहने हटविण्याच्या दृष्टीने लिलावाची प्रक्रिया सुरू आहे.
जयंत पाटील,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल