। रसायनी । वार्ताहर ।
चौक रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल, वावर्ले या शाळेच्या परिसरात औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या बिर्ला कार्बन इंडिया प्रा.लि. कंपनीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत तब्बल अडीचशे वृक्षांचे वृक्षारोपण बिर्ला कंपनीच्या पदाधिकार्यांमार्फत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या गजरात तसेच पुष्पवृष्टी करत सर्व पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रक्षाळे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या जडणघडणीचा आढावा घेत कंपनीमार्फत राबवत असलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले.
यावेळी बिर्ला कार्बन इंडियाचे युनिट हेड रवींद्र रघुवंशी,एच.आर. हेड निखिल भामरे, नदार इलांगो, उर्वीश आचार्य, प्रशांत विचारे, अभिनव सक्सेना, रोहित खैरनार, हरीश रावत, सचिन कंदले या सर्वांचाच महत्त्वपूर्ण प्रत्यक्ष सहभाग होता. पाहुण्यांच्या वतीने नदार इलांगो, उर्वीश आचार्य, युनिट हेड रवींद्र रघुवंशी, उमेश कदम आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बिर्ला कार्बन इंडिया कंपनीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. विद्यालयाच्या स्कुल कमिटी चेअरमन सुवर्णा मोरे, अरुण पारठे, लक्ष्मण मोरे, प्रशांत गायकवाड अनिल बडेकर, योगेश दरेकर, शसोपान अडसरे, एस. यु.पवार आदी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.