। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
लवकरच इंडियन प्रीमियर लीग 2025 ला सुरुवात होणार आहे. अशामध्ये प्रत्येक फ्रेंचायझीने आपल्या संघात बदल करण्यास सुरुवात केली आहे. आगामी आयपीएलसाठी पंजाब किंग्सने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक होता. त्याच्या प्रशिक्षणाखाली संघाने चांगली प्रगती केली होती. यानंतर नुकतेच त्याने दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षकपद सोडले. यानंतर आता प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सने त्यांच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.
रिकी पाँटिंग हा ऑस्ट्रेलिया संघाचा एक यशस्वी कर्णधार होता. त्याच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने सलग तीनदा आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते. त्यानंतर त्याने सलग सात वर्ष दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. दिल्लीचा संघ या सात वर्षात जेतेपदाला गवसणी घालू शकला नसला तरीही त्याच्या प्रशिक्षणाखाली अनेक तरुण खेळाडू उदयास आले. याआधी त्याने मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. तेव्हा मुंबई इंडियन्सने 2015 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. आयपीएल स्पर्धेत त्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे आता याचा फायदा पंजाब किंग्सला होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.