। खेड । प्रतिनिधी ।
तालुक्यातील चोरवणे गाव या अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात अतिवृष्टीमुळे पुल सरकल्याची घटना घडली आहे. यासंदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असते. अशाच एका अतिवृष्टीत मोठमोठी झाडे वाहत येवून ब्रिजला अडकली. त्यामुळे पुलावरून पाणी जाऊन पुल पुर्णपणे सरकला गेला.
या घटनेनंतर, संबंधित शासकीय अधिकारी वर्गाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केलेला आहे. ग्रुपग्रामपंचायतीने यापूर्वीच संबंधित कार्यालय व लोकप्रतिनिधी यांच्याकडे ठराव दिलेला आहे.
निवे पंचक्रोशीतील हा एकमेव पुल असून चोरवणे गावातील आठ वाड्यांना जोडणारा तसेच तालुका-जिल्ह्यासाठी दळणवळण करण्यासाठीचा मार्ग आहे. नदीच्या पलीकडे पंचायत तथा अन्य शासकीय कार्यालये, शैक्षणिक संकुल, बस थांबा आदी सेवासुविधांची केंद्र असल्याने या पुलावर सतत वर्दळ असते.