| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तहसील कार्यालयाने काढलेल्या थेट सरपंच यांच्या आरक्षण सोडतीत पोशीर ग्रामपंचायतीवर अन्याय झाला आहे. 20 वर्षांत काढण्यात आलेली आरक्षणे आणि त्या आरक्षणात केलेले बदल यामुळे पोशीर गावातील मनीष राणे आणि काही ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसर्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनी मध्यस्थी करून प्रसंगी न्यायालयात दाद मागण्यासाठी आपण ग्रामस्थांचे पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
थेट सरपंच आरक्षण सोडतीसंदर्भात प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात मनिष मारुती राणे व त्यांच्या सहकार्यांनी 13 मे पासून उपोषण सुरू केले होते. तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. संबंधित मागण्यांकडे प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
सुधाकर घारे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी कर्जत तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सचिन राऊत हे उपस्थित होते. यावेळी घारे यांनी प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि आरक्षण सोडतीबद्दल ग्रामस्थांच्या तक्रारी यांना न्याय देण्याची मागणी केली. त्यावेळी निवडणूक विभागाने न्याय दिला नाही तर आपण न्यायालयात जाऊन न्याय मिळवून आणू असे आश्वासन घारे यांनी पोशीर ग्रामस्थ यांना दिले. त्यावेळी माजी पंचायत समिती सभापती धोंडू राणे, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश राणे, उपसरपंच सचिन राणे तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.