| पाली/ वाघोशी | प्रतिनिधी |
सुधागड संघर्ष संस्थामधील तरुणांनी रायगड प्रदक्षिणा प्रमाणे सरसगड प्रदक्षिणा शिवजयंतीला गुरुवारी (दि. 19) सकाळी 6 वाजता आयोजित केली आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी तब्बल 52 जण या प्रदक्षिणेत सहभागी झाले होते. प्रदक्षिणेमुळे सरसगडाच्या भोवतालच्या ऐतिहासिक व नैसर्गिक परिसराची माहिती अनेकांना मिळते. मोहिमेत सहभागी होण्यासाठी अनेकजण उत्साही आहेत. प्रदक्षिणेचा मार्ग खडतर आहे. साहसी, जबाबदार ट्रेकिंगप्रेमीनी अवघड आणि जिद्दी अशा अविस्मरणीय प्रदक्षिणेचा अनुभव जरूर घ्यायला पाहिजे. मात्र, अतिउत्साही व नियम न पाळणाऱ्या ट्रेकर्सने भाग घेऊ नये असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. सरसगड प्रदक्षिणेसाठी रु. 100 एवढी नाममात्र नोंदणी फी आकारली आहे. नोंदणीसाठी अरविंद दंत 9272071534, कपिल पाटील 9226784255, अमित निंबाळकर 9273790850, प्रदीप गोळे 8087569292 यांच्याकडे करावा. अटी व शर्ती नोंदणी करताना दिल्या जातील असे
संस्थेतर्फे सांगण्यात आले.
ऐतिहासिक महत्त्व आणि दुर्गम रचना
प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेले पाली गाव सरसगड किल्ल्याच्या कुशीत वसलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे महत्त्व
ओळखून तो स्वराज्यात सामील केला आणि त्याच्या दुरुस्तीसाठी दोन हजार होण मंजूर केले होते. समुद्रसपाटीपासून 490 मीटर उंचीवर असलेल्या या किल्ल्याची बांधणी दुर्गमता आणि विपूल जलसंचय यावर भर देऊन करण्यात आली आहे. दूरवर टेहळणी करण्यासाठी मसरसफ असल्याने या किल्ल्याला ‘सरसगड' हे नाव मिळाले. किल्ल्याच्या दक्षिण बाजूला एकाच दगडात घडविलेल्या 111 पायऱ्या हे या गडाचे प्रमुख वैशिष्ट्य असून, गडाला 'दिंडी दरवाजा' या नावाने ओळखले जाणारे मजबूत प्रवेशद्वार आणि तटबंदीचे संरक्षण आहे.
गडावरील वास्तू सांस्कृतिक वारसा
किल्ल्यावर बाराही महिने स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध असलेला 3 मीटर खोल ‘मोती हौद' असून, बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी असे एकूण दहा हौद आहेत. गडाच्या परिसरात घोड्याची पागा, धान्य कोठारे, शस्त्रागारे, कैदखाने आणि दारू कोठारे कोरलेली आहेत. बालेकिल्ल्यावर जोगेश्वरी (केदारेश्वर) मंदिर आणि शहापीर दर्गा असल्याने येथे धार्मिक सलोखा पाहायला मिळतो.
सरसगड प्रदक्षिणेचे हे दुसरे वर्ष असून, या मोहिमेद्वारे तरुणांना गडाचा इतिहास आणि त्याभोवतीचा नैसर्गिक ठेवा जवळून अनुभवता येईल. रायगड प्रदक्षिणेच्या धर्तीवर आयोजित ही मोहीम खडतर असली तरी, साहसी ट्रेकर्ससाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
-प्रदीप (दादू) गोळे,
आयोजक, सुधागड संघर्ष संस्था.






