जिल्हा माहिती भवनासाठी चेंढरेतील सरकारी जागा प्रदान

। अलिबाग । प्रतिनिधी ।
चेंढरे (पिंपळभाट) ता. अलिबाग येथील जमीन रायगड जिल्हा माहिती कार्यालयास प्रदान करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुसज्ज माहिती भवन उभारण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड जिल्ह्यात स्वतंत्र माहिती भवन उभारण्यास मंजूरी मिळाली. त्यानंतर याबाबाबतच्या सर्व शासकीय प्रक्रिया प्राधान्याने व जलदगतीने होत आहेत. राज्य शासनाने केलेल्या या सहकार्याचे यानिमित्ताने त्यांनी आभार मानले आहेत.


रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संवादाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि संकल्पना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यास हे नियोजित जिल्हा माहिती भवन मोलाची भूमिका बजावणार आहे. अलिबाग चेंढरे (पिंपळभाट) येथील 15 गुंठे शासकीय जागेमध्ये उभारण्यात येणार्‍या या अद्ययावत माहिती भवनामध्ये मिनी थिएटर, मिनी स्टुडिओ, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, प्रदर्शन दालन, विविधोपयोगी सभागृह, डिजिटल वाचनालय, मीडिया संनियंत्रण कक्ष, प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरीता अद्ययावत प्रसारमाध्यम कक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र आदी व्यवस्था असणार आहे. पर्यटन व औद्योगिकदृष्ट्या संपन्न अशा रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे, सागरी वाहतूक या माध्यमातून येणारे पर्यटक आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील बहुतांश जनतेचे शेती आणि मासेमारी हे प्रमुख व्यवसाय असून ग्रामीण, डोंगराळ आणि दुर्गम भागात वास्तव्यास आहे,असे त्या म्हणाल्या. जिल्हा माहिती भवनाच्या निर्मितीसाठी अत्यंत मोलाची भूमिका व गतिमान कार्यवाही राज्य शासनाकडून होत आहे.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती ही शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हे माहिती भवन मोलाची भूमिका बजावेल.

अदिती तटकरे, पालकमंत्री
Exit mobile version