| महाड | प्रतिनिधी |
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाडच्या मुक्तछंद दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. महाड मधील समृध्दी हॉटेल सभागृह येथे ज्येष्ठ गझलकार रोहिदास पोटे यांच्या शुभहस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
मुक्त छंद दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत गोगावले, कोकण साहित्य भूषण प्रभाकर भुस्कुटे, कोमसाप नियामक मंडळाच्या सदस्या श्रीमती शोभाताई सावंत, कोमसाप जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, जिल्हा समन्वयक अ.वि. जंगम, महाड शाखाध्यक्ष गंगाधर साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार भरत गोखले यांनी कोमसापच्या साहित्यिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. साहित्यिकांनी सुरू केलेल्या विविध उपक्रमांना माझे नेहमीच सहकार्य राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. या विशेष समारंभाचे औचित्य साधून कोमसापच्या महाड शाखेकडून दी अण्णासाहेब सावंत अर्बन बँकेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई सावंत यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी रोहिदास पोटे यांनी आपल्या मनोगतात गझलेविषयी सखोल माहिती दिली. भविष्यात गझल कार्यशाळा घेण्याचे सांगितले. आपल्या शिक्षक आणि फाईल या कविता सादर करून सतत 20 वर्षे दिवाळी अंक प्रकाशित करणार्या कोमसाप महाड शाखेचे कौतुक केले, पुढील साहित्यिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. तर ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भुस्कुटे यांनी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाडचा इतिहास सांगितला. शोभाताई सावंत यांनी आपल्या मनोगतात साहित्यिकांना शुभेच्छा दिल्या.
संपादकीय मनोगतात सुधीर शेठ यांनी मुक्तछंदचा प्रवास, छपाई मागची भूमिका, धावपळ हे सांगताना कै.सुनंदाताई देशमुख यांच्या आठवणी सांगितल्या. प्रास्ताविकात महाड शाखेचे अध्यक्ष गंगाधर साळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुरुड शाखेचे अध्यक्ष संजय गुंजाळ तसेच ज्येष्ठ पत्रकार, श्रीवर्धन शाखेचे मार्गदर्शक श्री आनंद जोशी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या. जिल्हा युवाशक्तीचे अध्यक्ष सिद्धेश लखमदे, रोहा शाखाध्यक्ष संध्या दिवकर सोहळ्यास उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवयित्री प्रिया शहा यांनी केले. तर आभार गायत्री करमरकर यांनी मानले.