रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर ताण
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने अलिबागसह रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी शासकीय रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या रुग्णालयांमध्ये विशेष तज्ज्ञांसह अनेक महत्त्वाची पदे दीर्घकाळ रिक्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण 57 हून अधिक पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मोठा कामाचा ताण पडत असून, प्रलंबित कामांच्या निपटाऱ्यात विलंब होत आहे. परिणामी, रुग्णसेवेवरही विपरीत परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून, शहराच्या मध्यवर्ती भागात सुमारे 40 वर्षांपूर्वी 200 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात सहा उपजिल्हा रुग्णालये, नऊ ग्रामीण रुग्णालये, रोहा व माथेरान येथील नगरपरिषद दवाखाने, अलिबागमधील पोलीस दवाखाना, तळोजा येथील मध्यवर्ती कारागृह रुग्णालय तसेच जिल्हा क्षयरोग केंद्राचा समावेश आहे. या सर्व संस्थांचे प्रशासकीय नियंत्रण अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कार्यालयातून केले जाते.
रुग्णालयात अस्थापना, लेखा, नियोजन, प्रमाणपत्र, भांडार, रोखा शाखा तसेच आवक-जावक अशा विविध प्रशासकीय विभागांमार्फत कामकाज चालते. या विभागांद्वारे तक्रारींची हाताळणी, बैठकींचे नियोजन, प्रस्ताव तयार करणे, बदली प्रक्रिया, भरती प्रक्रिया, टपाल व्यवहार, तारांकित प्रश्नांची उत्तरे, वैद्यकीय प्रमाणपत्रे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, फिटनेस प्रमाणपत्रे, भांडार पडताळणी, आहार, सुरक्षा व स्वच्छता सेवा तसेच दैनंदिन खरेदी अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात.
जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. बाह्यरुग्ण विभागासह गंभीर आजारांवरील उपचारांसाठीही मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी असते. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णांना अपेक्षित दर्जाची सेवा मिळत नसल्याची तक्रार सातत्याने होत आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची 23 पदे रिक्त आहेत. यामध्ये अलिबाग जिल्हा रुग्णालयातील तीन, रोहा व कर्जत उपजिल्हा रुग्णालयांतील प्रत्येकी एक, म्हसळा व महाड येथील प्रत्येकी एक आणि मुरूड येथील दोन पदांचा समावेश आहे. या रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर 42 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी नियमित भरतीकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रशासनिक कामांचा वेग कमी झाला असून निर्णय प्रक्रियेत विलंब होत आहे. परिणामी, रुग्णांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणे आव्हानात्मक ठरत आहे. वैद्यकीय अधिकारी आणि तज्ञांच्या कमतरतेमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे.
कंत्राटी डॉक्टरांवर कारभार
जिल्हा रुग्णालयात 16 विशेष तज्ज्ञांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बालरोगतज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, शरीरविकृती, मनोविकार, चर्मरोग, क्षयरोग, नेत्रतज्ज्ञ आणि दंतचिकित्सक यांचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णालयाचा कारभार सध्या कंत्राटी डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
प्रशासकीय विभागातही कमतरता
अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागातही मनुष्यबळाची गंभीर कमतरता आहे. येथे प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक, अभिलेखापाल, लघु टंकलेखक आणि दूरध्वनी चालक अशी एकूण 20 पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी केवळ 9 पदे भरलेली असून, 11 पदे रिक्त आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. तसेच वरिष्ठ लिपिकांची 2 आणि कनिष्ठ लिपीकांची 5 पदे अनेक वर्षांपासून भरली गेलेली नाहीत. अभिलेखापाल आणि लघु टंकलेखकांची प्रत्येकी एक अशी दोन पदेही अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून, दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे.






