| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
कर्णधार संजू सॅमसन (60 धावा) व डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायर (नाबाद 56 धावा) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रविवारी झालेल्या आयपीएल लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सवर 3 विकेट व 4 चेंडू राखून मात केली. या विजयासह राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर कायम राहिला. हा त्यांचा चौथा विजय होता. गुजरात टायटन्सला दुसर्या पराभवाला सामोरे जावे लागले.
गुजरातकडून राजस्थानसमोर 178 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. यशस्वी जयस्वाल (1 धाव) व जॉस बटलर (0) या सलामीवीरांना अपयशाचा सामना करावा लागला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून राजस्थानच्या संघात दाखल झालेल्या देवदत्त पडीक्कल यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो 26 धावांवर बाद झाला. राशीद खानने देवदत्तला बाद केल्यानंतर रियान परागलाही पाच धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. संजू सॅमसन व शिमरॉन हेटमायर या जोडीने राजस्थानच्या विजयाची आशा कायम ठेवली. कर्णधार सॅमसन याने 32 चेंडूंमध्ये 3 चौकार व 6 षटकारांसह 60 धावांची खेळी केली.
नूर अहमद याच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात सॅमसन बाद झाला. त्यानंतर हेटमायर याने 26 चेंडूंमध्ये नाबाद 56 धावा करीत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. याआधी राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर रिद्धीमान साहा 4 धावांवर बाद झाला. साई सुदर्शनही 20 धावांवर धावचीत झाला. सलामीवीर शुभमन गिल व कर्णधार हार्दिक पंड्या यांनी गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 59 धावांची भागीदारी रचली. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच युझवेंद्र चहल याने हार्दिकला 28 धावांवर बाद केले.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स 20 षटकांत 7 बाद 177 धावा (शुभमन गिल 45, साई सुदर्शन 20, हार्दिक पंड्या 28, डेव्हिड मिलर 46, अभिनव मनोहर 27, संदीप शर्मा 2/25)
राजस्थान रॉयल्स 19.2 षटकांत 7 बाद 179 धावा (संजू सॅमसन 60, शिमरॉन हेटमायर नाबाद 56, मोहम्मद शमी 3/25).