जिल्ह्यात भाताचे विक्रमी उत्पादन
| आविष्कार देसाई| रायगड |
निसर्गाच्या कृपेमुळे या वर्षी पाऊस समाधानकारक बरसला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात भाताचे तब्बल 31 लाख 48 हजार क्विंटल भाताचे विक्रमी उत्पन्न आले आहे. भातपिकाचे उत्पन्न वाढल्याने शेतकर्यांचाआर्थिक स्तर उंचावण्यास मदत मिळणार आहे. सध्या शेतामध्ये मळणीची कामे सुरु आहेत. मात्र, मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकर्यांना भाताच्या मळणीसाठी यंत्राचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे काही अंशी शेतकर्यांच्या खिशाला चाट बसत असल्याचे चित्र आहे.
शेतामध्ये भात पिकवायाचा आणि समुद्र, खाडी, नदी किनारी मासेमारी करायची आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह करायचा, असे जिल्ह्यातील जीवनमान आहे. सुपीक जमिनी आहेत, तेथील शेतकरी नवीन उद्योगांना कडाडून विरोध करताना दिसून येत आहेत. शेती व्यवसायाशी आजही विविध कुटुंबं आणि त्यांच्या पिढ्या जोडल्या गेल्या आहेत. रायगड जिल्ह्याने गेल्या काही वर्षात सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना केला आहे. सध्या शेतामध्ये मळणीची कामे सुरु आहेत. मात्र, मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकर्यांना भाताच्या मळणीसाठी यंत्राचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे काही अंशी शेतकर्यांच्या खिशाला चाट बसत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये 95 हजार 645 हेक्टर भातशेतीच्या क्षेत्रापैकी 78 हजार 700 हेक्टरवर भात रोपांची लागवड करण्यात आली होती. आता पीक हाताला आले आहे. एका हेक्टर क्षेत्रावर साधारण 40.97 क्विंटल भाताचे उत्पन्न येते. त्यानुसार लागवड केलेल्या 78 हजार 700 हेक्टरवर 31 लाख 48 हजार क्विंटल भाताचे उत्पादन आले आहे. मोठ्या प्रमाणावर भाताचे उत्पादन झाल्याने शेतकरीदेखील मालामाल होऊन त्यांचादेखील आर्थिक स्तर उंचावण्यास मदत मिळणार आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात 13 हजार 230 हेक्टर, पनवेल 5 हजार 990 हेक्टर, कर्जत 9 हजार 440 हेक्टर, खालापूर दोन हजार 822 हेक्टर, उरण दोन हजार 411 हेक्टर, सुधागड एक हजार 984 हेक्टर, पेण 10 हजार 963 हेक्टर, महाड 8 हजार 230 हेक्टर, माणगाव सात हजार 160 हेक्टर, रोहा सात हजार 100 हेक्टर, पोलादपूर दोन हजार 520 हेक्टर, मुरूड तीन हजार 201 हेक्टर, श्रीवर्धन एक हजार 350 हेक्टर, म्हसळा एक हजार 366 हेक्टर आणि तळा तालुक्यात एक हजार 30 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष लागवड करण्यात आली आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी 25 हजार 100 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. यात 22 हजार 750 क्विंटल सुधारित, तर 250 क्विंटल संकरित भात बियाण्यांचा समावेश होता. खरीप हंगामासाठी 20 हजार 20 मेट्रिक टन खतांची मागणी शासनाकडे रायगड जिल्हा कृषी विभागाने केली होती.
शेती क्षेत्रात होणारी घट लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतीची उत्पादकता वाढविण्यावर भर दिला होता. सुधारित आणि संकरित बियाणे घेण्यासाठी तसेच आधुनिक पीक लागवड पद्धतीचा वापर करण्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहित करण्यात आले होते. पाऊस समाधानकारक झाल्याने निश्चितपणे भाताच्या उत्पादनात वाढ होईल.
जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी,
रायगड