सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस जाहीर करणार?
| रायगड | आविष्कार देसाई |
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिना उलटून गेल्यानंतरही महायुती सरकारकडून पालकमंत्रीपदाचे वाटप अद्याप केलेले नाही. महायुती सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांकडून सातत्याने जहरी टीका केली जात आहे. तीनही पक्षांमध्ये पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अनेक जिल्ह्यात पालकमंत्रीपदाकरिता तीनही पक्षातील काही मंत्र्यांनी दावा ठोकला आहे. प्रामुख्याने रायगड जिल्हा, बीड, सातारा, जळगाव या जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदाचे घोडे अडले आहे.
येत्या दोन दिवसांत महायुतीची बैठक होणार असून, बैठकीत पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत. सोमवारी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्रीपदांचे वाटप जाहीर करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पुढील आठवड्यात प्रजासत्ताक दिन आहे. या दिवशी जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. त्यामुळे सरकारकडून पालकमंत्रीपदाची नावे पुढील काही दिवसात जाहीर होणे आवश्यक आहे. अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडूनच ध्वजवंदनाचा कार्यक्रम उरकावा लागणार असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे लपलेले नाही. महाविकास आघाडीच्या कालावधीत भरत गोगावले यांना मंत्रीपदापर्यंत मजल मारता आली नसल्याने त्यांचे पालकमंत्री होण्याचे स्वप्न अपुरे राहिले होते. त्यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी बाजी मारली होती. मंत्रीपदासाठी शिवलेला कोट मंत्री भरत गोगावले यांना तसाच ठेवावा लागल्याबाबत विरोधकांसाठी तो चेष्टेचा विषय झाला होता. आता मात्र महायुतीच्या कालावधीत गोगावले हे मंत्रीपदी विराजमान तर झाले आहेत, मात्र पालकमंत्री होण्याचा त्यांचा अट्टाहास अद्याप पूर्ण झालेला नाही. या ठिकाणी पुन्हा मंत्री गोगावले यांच्यासमोर मंत्री आदिती तटकरे यांचे आव्हान कायम असल्याचे दिसते. शिंदे गटाचाच पालकमंत्री होण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांनी चांगलीच फिल्डींग लावली आहे. मात्र, तटकरेंनी त्यांना पुन्हा मात दिली तर, गोगावले यांना फक्त मंत्रीपदावरच समाधान मानावे लागेल, अशी भीती त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रायगड जिल्ह्याला मंत्री गोगावले यांच्या रुपाने पालकमंत्री देतील, अशी आशादेखील त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. याबाबत आता सोमवारीच पडदा उघडला जाणार आहे.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बीड जिल्ह्यातून पालकमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडें यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यामध्ये मंत्री मुंडे यांच्या स्वपक्षातील आमदारांचाही समावेश आहे. तसेच बीडमधील हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनीच पालकमंत्रीपद स्वीकारावे, अशी मागणीही केली जात आहे.
सातारा जिल्ह्याला तब्बल चार मंत्री लाभले आहेत. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, शिवसेना शिंदे गटाचे शंभुराज देसाई आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे या चारही मंत्र्यांपैकी कोणाला पालकमंत्रीपद मिळणार याकडे साताराकरांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय सावकारे असे तीन कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. या ठिकाणीदेखील महायुतीमधील नाराजीनाट्याचा अंक पहायला मिळत आहे.