अनेक समस्या आ वासून उभ्या; लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
| माथेरान | मुकुंद रांजाणे |
महाराष्ट्र राज्यातील माथेरान हे एकमेव पर्यटनस्थळ असावे की, याठिकाणी अनेक सेवासुविधा आजमितीपर्यंत पुर्ण होऊ शकलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधी येथील मतदान संख्येमुळेच स्थानिक रहिवाशांच्या समस्यांकडे ढुंकूनही पहात नाहीत. केवळ पाच वर्षांनी निवडणूकीच्या वेळेस नाममात्र आश्वासनांची बरसात होत असते; परंतु, प्रत्यक्षात मात्र निवडून आल्यावर ही मंडळी नेहमीच कानाडोळा करताना दिसतात. त्यामुळे आजही येथील सर्वसामान्य व्यापारी आणि कष्टकरी आपले संघर्षमय जीवन जगताना दिसत आहे. पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या या गावाला विकासाकडे नेण्यासाठी जबाबदार लोकप्रतिनिधी दुर्लक्षच करीत आहेत. त्यामुळेच अनेक समस्या आजही आ वासून स्थानिकांसमोर उभ्या आहेत.
माथेरान या पर्यटनस्थळाकडे जबाबदार लोकप्रतिनिधींचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. केवळ अल्प मतदान संख्येमुळेच कुणीही येथील पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणाऱ्या रहिवासांच्या समस्यांकडे ढुंकूनही पहात नाहीत. दर पाच वर्षांनी विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळात पंधराशे मते एकाच उमेदवाराला मिळत असतात. त्यामुळे निवडणूक वेळेस केवळ नाममात्र आश्वासनांची बरसात होत असते; परंतु, प्रत्यक्षात निवडून आल्यावर ही मंडळी नेहमीच कानाडोळा करताना दिसतात. त्यामुळेच आजही येथील सर्वसामान्य व्यापारी आणि एखादा कष्टकरी आपले संघर्षमय जीवन जगत आहे. पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या या गावाला विकासाकडे नेण्यासाठी जबाबदार लोकप्रतिनिधी दुर्लक्षच करीत आलेले आहेत. त्यामुळेच अनेक समस्या आजही आ वासून स्थानिकांसमोर उभ्या आहेत.
मागील अनेक वर्षांपासून येथील मिनी बस सेवा डबघाईला आलेली असताना साध्या दोन नवीन बसेस उपलब्ध होऊ शकत नाहीत. ही खरोखरच खेदजनक बाब असल्याचे बोलले जात आहे. मिनी बस अनेकदा घाटात बस बंद पडत असते. तरीसुद्धा स्वस्त प्रवासाच्या दृष्टीने प्रवाशांना जीव मुठीत धरून या घाटरस्त्यातून मार्गक्रमण करत आहेत. माथेरानला होणारा वाढीव पाणी पुरवठा नेरळच्या उल्हास नदीतून होत असतो. परंतु, अनेक वर्षांपासून याठिकाणी पाण्याच्या पंपाची दुरुस्ती केली जात नसून ऐन सुट्ट्यांच्या हंगामात पाणी समस्या उद्भवली असल्याने याचा एकंदरीत इथल्या पर्यटनावर परिणाम होताना दिसून येत आहे. तसेच, सुप्रीम कोर्टाकडून येथील रस्त्यांची दुरुस्ती करावी, असे स्पष्ट निर्देश असतानाही राजकीय आकसापोटी ठराविक लोकांची मर्जी राखण्यासाठी विकास कामे पूर्ण केली जात नाहीत. तसेच, पर्यावरण पूरक ई-रिक्षांची संख्या खूपच कमी असल्याने स्थानिकांसह पर्यटकांची हेळसांड होत आहे. काही ई-रिक्षा चालक सुद्धा माजोरीपणा करताना दिसत आहेत. तसेच, पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या मिनिट्रेन बाबतीत आजही गांभीर्याने विचार केला जात नाही. पूर्वी नेरळहुन माथेरानला येण्यासाठी ट्रेनच्या 6 फेऱ्या व्हायच्या. परंतु, आजच्या घडीला केवळ 2 फेऱ्या होत आहेत. बहुतेक पर्यटक खासकरून मिनिट्रेन मधून प्रवास करण्याच्या उद्देशाने येत असतात; परंतु, तिकीट उपलब्ध न झाल्याने त्यांचा देखील हिरमोड होत आहे. जोपर्यंत येथील राजकीय पक्षांनी अल्प मतदारांना गोंजारण्यात वेळ व्यर्थ घालविण्यापेक्षा विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक भूमिका घेतली, तर निश्चितच हे पर्यटनस्थळ नावारूपाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.







