। अलिबाग । प्रमोद जाधव ।
मच्छी व्यवसाय संकुल होणार खुले
रायगड जिल्ह्यात कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये अलिबाग, मुरूड, रोहा, पेण, पनवेल, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यांमध्ये कोळी समाजाची संख्या प्रचंड आहे. मासेमारी करून हा समाज त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. जिल्ह्यात सुमारे तीन हजारहून अधिक मासेमारी बोटी आहेत. त्यामध्ये यांत्रिकी सुमारे दोन हजार बोटींचा समावेश आहे. अलिबाग हे शहर पर्यटन व ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे ठरत आहे. या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटन वाढीला चालना देण्याबरोबरच मच्छीमारांच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अलिबाग शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मच्छी व्यवसाय संकुल उभारणीचे काम सुरु होते. हे काम अंतिम टप्प्यात आहे. एक ते दोन महिन्यात ही कामे पुर्ण होणार आहेत. त्यामध्ये रंगकाम, बाहेरच्या परिसरात पेव्हर ब्लॉक लावण्याची कामे प्रगतीपथावर सुरु असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहेत.
मच्छीमारांना आधुनिक पध्दतीने मासेमारी करण्याचे धडे मिळावेत, त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी अलिबाग कोळीवाड्यालगतच राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत मच्छी व्यवसाय संकुल बांधण्यात आले आहे. या संकुलामध्ये मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तांचे कार्यालय, मच्छी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, अद्ययावत असे मत्स्यालय, ग्रंथालय, वाचनालय तसेच सभागृह असणार आहे. प्रशिक्षणार्थींसाठी वसतीगृहदेखील या संकुलात असणार आहे. 856 चौरस मीटर क्षेत्रात हे संकुल बांधण्यात आले आहे. या संकुलाचे 95 टक्के काम पुर्ण झाले आहे. पाच टक्के काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून असलेली संकुलाची प्रतिक्षा आता थांबणार आहे. अलिबागसह जिल्ह्यातील कोळी समाजासह मच्छीमारांना हक्काचे संकुल मिळणार आहे. मच्छीमारांच्या सर्वांगिण विकासासाठी हे संकूल दिशा दर्शक केंद्र ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. 2025 मध्ये हे संकुल खुले होणार आहे.
काशीदमधील रो-रो जेट्टीचे काम होणार पुर्ण
रायगड जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने कायमच नावारुपाला आला आहे. काशिद याठिकाणी लाखो पर्यटक आवर्जून भेट देतात. सुंदर असा समुद्रकिनारा, वेगवेगळया प्रकारची सुरूची झाडे, घरगुती पध्दतीने मिळणारे कॉटेजमधील भोजनाचा आनंद पर्यटक मनमुरादपणे घेतात. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, सोलापूर, नागपूर, अशा अनेक जिल्हयातील पर्यटक काशीद समुद्रकिनारी फिरण्यास येतात. काशीद व मुरूड तालुक्यातील अनेक तरुण नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणेमध्ये जातात. त्यांना त्यांच्या गावी येताना गेटवे ते मांडवा, मांडवा ते अलिबाग त्यानंतर एसटी बस अथवा खासगी वाहनांचा आधार घेत काशीद व मुरूडमध्ये यावे लागते. परंतु आता पर्यटकांसह स्थानिकांचा हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. काशीद समुद्रकिनार्यापासून काही अंतरावरच रो - रो जेटीचे काम सुरु आहे.
सागरमाला योजनेअंतर्गत काशीद समुद्रकिनार्यापासून काही अंतरावर टर्मिनल इमारत, ब्रेक वॉटर, तरंगती जेटी उभारली जाणार आहे. ब्रेक वॉटर व टॉप काँक्रीटसाठी 111 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून 90 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. तरंगत्या जेटीसाठी 56 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. 44 कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. सध्या जेटीचे काम सुरू आहे. तरंगत्या जेटीचे काम नव्या वर्षात पुर्ण होण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या तसेच मुंबईमध्ये नोकरीनिमित्त असलेल्या चाकरमान्यांना लवकरच मुंबईपर्यंत दीड तासात पोचण्याची संधी रो रो च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
दोन हजार किमीचे रस्ते होणार चकाचक
रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित एक हजार 900 वाड्यांचा समावेश असून ग्रामीण भागाची लोकसंख्या सुमारे 16 लाख इतकी आहे. गावांतील रस्त्यांची लांबी पाच हजार 500 किलो मीटर असून जिल्ह्यातील दोन हजार किलो मीटरचे रस्ते खराब झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावांचा विकास केला जातो. गावांमध्ये रस्ते व अन्य सुविधा राबविल्या जातात. मात्र खराब झालेल्या अडीच हजार किलो मीटरच्या रस्त्याची दुरूस्ती केली नसल्याने गावांच्या विकासावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. गावांपर्यंत जाण्यासाठी खड्डेमय रस्ते असल्याने प्रवास करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होण्याची भीती व्य्कत केली जात आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्राम विकास विभागाकडून सूमारे 14 कोटी रुपयांचा निधी जिल्हयासाठी मंजूर केला आहे. जिल्हा परिषदेकडून त्याची निविदाही काढण्यात आली होती. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या आचारसहितेमुळे ही कामे लांबणीवर गेली. आता नवीन सरकार स्थापन झाले आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री पद जोपर्यंत होत नाही, तो पर्यंत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणे कठीण आहे. जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त झाल्यावर मार्च अखेरपर्यत दोन हजार किलो मीटरचे रस्ते चकाचक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवीन जिल्हा रुग्णालयाचे काम होणार सुरु
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत जूनी झाली आहे. हे रुग्णालय सुमारे दोनशे खाटांचे आहे. या ठिकाणी डायलेसीस, सोनोग्राफी, एक्सरे सेंटर असून वेगवेगळ्या आजारावरील तज्ञदेखील उपलब्ध आहेत. वाढत्या नागरिकीकरणामुळे रुग्णांची संख्यादेखील येण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलादपूरपासून श्रीवर्धन, माणगावमधील रुग्णदेखील अलिबागमध्ये उपचारासाठी येतात. रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी जून्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधली जाणार आहे. नवीन रुग्णालय लवकरच बांधले जाणार आहे. नवीन रुग्णालयासाठी 105 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तीनशे खाटांचे हे रुग्णालय असणार आहे. रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी विशेष तज्ञ, कर्मचारी, डायलेसी सेंटर व इतर सुविधा उपलब्ध असणार आहेत. या नव्या रुग्णालयासाठी मंजूरी प्राप्त झाली आहे. नवीन 2025 या वर्षात नव्या रुग्णालयाचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
अलिबाग-रोहा रस्त्याचे काम पुर्ण होण्याची अपेक्षा
अलिबाग रोहा व माणगाव या तीन तालुक्यांना जोडणारा 84 किलो मीटरचा रस्ता गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित आहे. रस्त्यावरील खड्डे, खडीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी अलिबागपासून रोहा साईपर्यंतच्या रस्त्यासाठी 157 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे 50 टक्के काम पुर्ण झाल्याचा दावा बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे. बांधा वापरा आणि हस्तांतरण करा या धर्तीवर रस्त्याचे काम करण्यात आले आहे. रुंदीकरण, डांबरीकरण व मजबूतीकरण या नुसार रस्त्याचे काम केले जाणार आहे. काँक्रीटीकरणासह रुंदीकरणाचे काम अपुर्णच आहे. 2024 पर्यंत या रस्त्याचे काम पुर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु प्रवाशांसह नागरिकांची घोर निराशा झाली. सुरुवातीला नेमण्यात आलेल्या ठेकेदाराकडून काम संथ गतीने करण्यात आले. त्यानंतर दुसरा ठेकेदार नेमण्यात आला. त्यांच्याकडूनही कामाची गती फारसी दिसली नाही. अलिबाग वावे मार्गावरील खानाव ते गेल कंपनीपर्यंतचा काँक्रीटरस्ता अपुर्ण अवस्थेत राहिल्याने गतवर्षी पावसाळ्यात खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. मात्र नव्या वर्षात हे काम शंभर टक्के पुर्ण करण्याचा संकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. त्याची तयारी ही गेल्या काही दिवसांपासून सुरु केली आहे. त्यामुळे 2025 या नव्या वर्षात रस्त्याचे काम पुर्ण होण्यची अपेक्षा व्यक्त केल जात आहे.
शाळांवर राहणार सीसीटीव्हीची नजर
रायगड जिल्ह्यामध्ये अडीच हजारहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा आहे. या शाळांपैकी फक्त 49 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आली आहेत. शाळांबरोबरच तेथील विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. डिसेंबर2024 पर्यंत हे काम पुर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु निधी अभावी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम लांबणीवर गेले आहे. रायगड जिल्हयातील दोन हजार 479 शाळा सीसी कॅमेराविनाच आहेत. या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे मागणी केली आहे. परंतु जिल्हा नियोजन समितीची बैठक न झाल्याने निधी मंजूर करण्याबरोबरच वितरण करण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नव्या वर्षात जिल्ह्यातील शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.