। पनवेल । प्रतिनिधी ।
सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्ग क्र. 1 वर 20 जानेवारी 2025 पासून मेट्रोच्या फेर्यांचे सुधारित वेळापत्रक लागू होणार असून सकाळी आणि सायंकाळी सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे.
सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गावर 17 नोव्हेंबर 2023 पासून मेट्रो सेवेचे परिचालन सुरू झाले असून या मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सीबीडी बेलापूर परिसर, तळोजा औद्योगिक क्षेत्र आणि सिडकोच्या गृहसंकुलांना या मेट्रो मार्गाद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. सर्वाधिक गर्दीच्या वेळी प्रवास करणार्या प्रवाशांना वाढीव मेट्रो फेर्यांचा लाभ व्हावा याकरिता सदर मार्गावर 20 जानेवारी 2025 पासून मेट्रो फेर्यांचे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, बेलापूर आणि पेंधर स्थानकांतून सकाळी 06.00 वाजेपासून मेट्रो सेवा सुरू होणार आहे.