आरोग्यावर परिणाम होण्याची भीती
। पेण । प्रतिनिधी ।
पेण शहरापासून 2 किमी अंतरावर असणार्या श्री क्षेत्र पाटणेश्वरची पूर्ण खलाटी उन्हाळी हंगामातील भात शेती बहरलेली मनमोहक दृष्य मनाला भुरळ पाडताना दिसते. रणरणत्या उन्हामध्ये पाटणेश्वर हद्दीतील हिरवा शालू परिधान केलेली भातपिके डोलताना दिसत आहेत.मात्र ही संपूर्ण भातशेती सांडपाण्यावर केली जात असल्याने भविष्यात येथील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
साधारणताः20 ते 25 एकरामध्ये पाटणोली ग्रामस्थ शेती गेली 5 ते 6 वर्ष करीत आहेत. पेण शहराची वाढलेली लोकसंख्या त्यामुळे मोठया प्रमाणात सांडपाणी पाटणेश्वर हद्दीध्ये सोडले गेले आहे. या सांडपाण्याचा उपयोग करून पाटणोली ग्रामस्थांनी शेत मळयांबरोबर पालेभाजी, फळफाज्यांबरोबर भात शेतीही लावायला सुरूवात केली आहे. त्यामुळे पूर्ण गाव उन्हाळी शेतीमुळे समाधानी आहे. असे असले तरी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने या सांडपाण्याचा भविष्यात दुष्परिणाम पाटणोली गावाच्या हद्दितील शेतीला उद्भवल्याशिवाय राहणार नाही.
आज जरी बहरलेली शेती नेत्रसुख देत असेल तरी भविष्यात सांडपाण्याचा प्रमाण वाढल्यास पूर्ण शेती दलदलयुक्त होण्याची शक्यता आहे, कारण पेण नगरपालिका शहराचे सांडपाणी योग्य दिशेने नाल्यात सोडत नाहीत. याचप्रमाणे साधारणताः 15 ते 20 वर्षापूर्वी पाटणोली हद्दीतील नाला पेण नगरपालिका स्वखर्चात साफ करून देत होती. परंतु आत्ताच्या घडीला रेल्वे क्रॉसिंगच्या पुढे सांडपाणी सोडल्याने आजूबाजूच्या जमिनी दलदलयुक्त व जलपर्णी वनस्पतीने भरलेल्या दिसत आहेत. वेळोवेळी पाटणेश्वर ग्रामस्थांनी याबाबत पेण नगरपालिकेला तोंडी, लेखी, तक्रार केली असून देखील पेण नगरपालिकेचे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आज जरी पाटणेश्वर हद्दिमध्ये दुबार भातशेती दिसत असली तरी भविष्यात या शेतीवर जलपर्णींचे आक्रमण होउन जमिनीमध्ये दलदल होईल अशी भिती जुने जाणते शेतकरी करत आहेत.
पूर्ण खलाटी नापिक होईल- नरेद्र पाटील
आज पूर्ण पाटणेश्वर खलाटीमध्ये मोठया प्रमाणात उन्हाळी भातशेतीची लागवड केली जाते. त्यामुळे शेतीमध्ये उत्पन्नही चांगले येते पूर्वी पेण शहरातील सांडपाण्यावर भाजीपाला लावण्याचे काम ग्रामस्थ करत होते. पंरतु, गेल्या 10 वर्षात सांडपाणी एवढया मोठया प्रमाणात खलाटीत सोडले आहे. त्यामुळे सांडपाणी जाण्याचा जो ओढा होता तो पूर्ण जलपर्णींने भरून गेले आहे. त्यामुळे पाणी आजू बाजूला जाऊन मोठया प्रमाणात शेती दलदल युक्त झाली आहे मात्र, काही तरुण शेतकर्यांनी या पाण्याचा उपयोग करून दुबार शेतीची सुरूवात केली आहे. परंतु, ज्या प्रमाणात पेण शहराची लोकसंख्या वाढत आहे आणि सांडपाणी येत आहे त्यामुळे पुढील पाच वर्षच पाटणेश्वर खलाटी शेती लावण्यासाठी उपयोगी ठरेल कारण नगरपालिकेकडून नाला साफ करण्याचे कोणतेही प्रयोजन केले जात नाही.
पाटणोली ग्रामपंचायतीच्या हद्दितून जाणार्या नाल्याची पाहणी करुन सांडपाणी योग्य मार्गावर जाईल. त्यावर उपाययोजन करु जेणेकरुन भविष्यात शेती नापीक होण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.
जीवन पाटील मुख्याधिकारी पेण