नाडे गावात नरबळीची शक्यता
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील नाडे गावात नुकताच पैशाचा पाऊस पाडण्याचा विधी घडला होता. या विधी दरम्यान एका माणसाची नरबळी देण्याची शक्यता होती. ज्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही तिहेरी (कायद्याची, पोलिसांची आणि जादूटोणा) भीती होती. या भीतीच्या वातावरणातून गावकर्यांना मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पेण शाखेने शुक्रवारी (दि.14) नाडे गावात दोन तासाचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच, त्यांना कायदेविषयक सखोल माहिती देण्यात आली.
व्याख्यानाच्या सुरुवातीला नितीन निकम यांनी महा. अंनिसची भूमिका आणि कार्य याबद्दल माहिती सांगितली. त्यांनी सांगितले की, महा. अंनिस समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करते आणि हे कार्य सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समितीने केलेल्या कामाची माहिती देऊन गावकर्यांना आश्वस्त केले. व्याख्यान संपल्यानंतर गावकर्यांनी आपल्या मनातील कायद्याची आणि जादूटोण्याची भीती दूर झाल्याचे सांगितले. त्यांनी महा. अंनिसच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि अशा प्रकारचे जागरूकता कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची मागणी केली.
पोलिस आणि कोर्ट तुमच्याच बाजूने आहेत. मात्र, जेव्हा ही यंत्रणा तुमच्या बाजूने नाही असे तुम्हाला वाटेल, तेव्हाही मी वकील म्हणून तुमच्यापाठी भक्कमपणे उभा असेन.
अॅड. संकल्प गायकवाड,
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मांत्रिक, भगतांचा प्रत्यक्षिकासह भांडाफोड
संदेश गायकवाड यांनी गावकर्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मी गेल्या अनेक वर्षात अनेक मांत्रिक आणि भगतांचा भांडाफोड केला आहे. काहींना माफी मागायला लावली तर काहींना तुरुंगात पाठवले आहे. हे बाबा आणि मांत्रिक मुळात भित्रे असतात; परंतु, तुम्ही घाबरता म्हणून तुमच्या भीतीचा फायदा घेऊन तुमचे शोषण करतात. हे शोषण सामाजिक किंवा आर्थिक असू शकते. तसेच, हे मांत्रिक आणि बाबा महिलांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन लैंगिक शोषणही करतात. ज्या भोंदू बाबांना तुम्ही घाबरता, तेच बाबा आम्हाला घाबरतात. ते आमचे आव्हान कधीच स्वीकारत नाहीत. त्यांनी या भोंदूबाबांचे चमत्कार कसे फसवेचे असतात, हे प्रात्यक्षिक करून दाखवले.