। कोर्लई । वार्ताहर ।
संपूर्ण देशात रस्ता सुरक्षा अभियान महिनाभर राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रायगड जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा वाहतूक शाखा रायगड-अलिबाग व लायन्स क्लब श्रीबाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (दि.11) रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर व जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रशांत म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांविषयी सविस्तर माहिती देऊन वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व समजावून सांगितले. प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व विशद केले. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे चेअरमन जैनुद्दीन कादरी व प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाला अल्ताफ मलिक, इम्रान मलिक, इस्माईल शेख व तौसिफ़ फत्ते, फौजदार संतोष गायकवाड, सहाय्यक फौजदार महेंद्र खोत, पोलिस हवालदार किशोर पठारे आणि मंगेश कावजी उपस्थित होते.