मयत इसम जिवंत दाखवून केला व्यवहार
9 आरोपींवर गुन्हा दाखल
। माणगाव । प्रतिनिधी ।
मयत इसम जिवंत दाखवून तोतया इसम उभा करून बनावट पॅन कार्ड तयार करून संगनमताने कट रचून आपल्या आर्थिक फायद्याकरिता जमिनीची विक्री करून फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी 9 आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, फिर्यादी यतीन उल्हास टुमणे यांचे काका अरविंद विश्वनाथ टुमणे व उल्हास शंकर टुमणे हे जमिनीचे मूळ मालक असून जमीन मालक अरविंद विश्वनाथ टुमणे हे सन 2008 साली मयत असताना ते जिवंत आहेत असे दाखवून त्यांच्या ठिकाणी तोतया इसम उभा करून बनावट पॅन कार्ड त्यांच्या नावे तयार करून त्यांची ओळख आरोपी यांनी देऊन हेच जमिनीचे मूळ मालक आहेत असे सांगून मौजे साखळेवाडी ता.माणगाव सर्वे नं.56 क्षेत्र 5-20-0 या जमिनीची विक्री केली. यातील आरोपी मिलिंद चंद्रकांत फोंडके (वय-48) रा.निजामपूर ता.माणगाव, रवींद्र वसंत भोईर (वय-40), निसेल रवींद्र भोईर(वय-20) दोन्ही रा.नेरुळ नवी मुंबई, नितीन चंद्रकांत फोंडके(वय-50) रा.निजामपूर ता.माणगाव, केशव गोविंद ओक रा.बामणगाव ता.माणगाव, असिफ याकूब दळवी रा.निजामपूर ता.माणगाव, सखाराम धोंडू मांडवकर रा.भाले ता.माणगाव व दोन अनोळखी इसम अशा एकूण आठ आरोपी यांनी संगनमत व कट रचून आपल्या आर्थिक फायद्याकरिता जमिनीची विक्री करून फिर्यादीची फसवणूक केली.
या गुन्ह्याप्रकरणी आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.55/2022 भादवि संहिता कलम 419, 420, 464, 465, 467, 468, 471, 120(ब),34 सह नोंदणी अधिनियम 2008 चे कलम 82 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भोजकर हे करीत आहेत.