चौपदरीकरणाचे कामही संथगतीने
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग मागील चौदा वर्षांपासून रखडला आहे. त्याचा फटका कोकणातील पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला बसला आहे. महामार्गावरून मुंबईतून कोकणात येणार्या चाकरमान्यांना बारा ते पंधरा तासांचा विलंब सहन करावा लागत आहे. आता राज्याने जानेवारी 2026 अशी महामार्ग पूर्णत्वाची नवीन तारीख दिली आहे; मात्र कामाची गती पाहता चौपदरीकरण पूर्णत्वासाठी आणखी दोन वर्षे जाण्याची शक्यता आहे.
सलग सुटीच्या हंगामात कोकण बहरलेले असते. गोव्याकडे जाणारी पर्यटकही रत्नागिरी, सिंधुदुर्गात थांबतात. त्यामुळे सुटीच्या हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र, सध्या रस्ते खराब असल्यामुळे गोव्याकडे जाणारे पर्यटक रेल्वे आणि हवाई वाहतुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे सुटीच्या हंगामातील उलाढाल कमी झाली आहे.
राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग उभारणीसाठी 936.25 कोटीचे 52 उद्योग आणि सिंधुदुर्गात 313.56 कोटींचे 43 उद्योग प्रस्तावित केले आहेत. या उद्योगातून रत्नागिरीत 1 हजार 125 आणि सिंधुदुर्गात 872 थेट रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महामार्गाचे काम लवकर पूर्ण झाल्यास उद्योग क्षेत्राला तसेच, पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल.
मुंबई ते गोवा महामार्ग में 2025 पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही सरकारकडून दिली होती. परंतु, चौपदरीकरण कामाची गती धीमी राहिल्याने यंदा शिमगोत्सत्तासाठी गावी येणार्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील दुपदरी रस्ता तसेच, माणगाव आणि इंदापूर शहरामध्ये प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. यामध्ये चाकरमान्यांना चार ते पाच तास नाहक अडकून पडावे लागत आहे.
कशेडी ते लांजा या टप्पातील खेड रेल्वेस्थानक पुलाचे काम अपूर्ण आहे. परशुराम घाटातील कामही अद्याप शिल्लक आहे. चिपळूण शहरातील पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. लांजा शहरातील पुलाचे काम अपूर्ण आहे. पाली शहरातही उड्डापुलाचे केवळ खांब उभारले आहेत, तर हातखांबा येथील उड्डापुलाचे काम संथगतीने सुरू आहे, तसेच संगमेश्वर येथील उड्डापुलाचेही काम संथगतीने सुरू आहे.