उल्हास नदीच्या पात्रालगत दगडी संरक्षण भिंत

बामचा मळा येथील पाण्याचा प्रवाह बदलणार


| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रालगत दगडी संरक्षण भिंत बांधली जात आहे. कर्जत नगरपरिषद हद्दीत हे बांधकाम सुरू असून त्या संरक्षण भिंतीचा मोठा फटका शनी मंदिर परिसराला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यासाठी पालिकेची परवानगी नसताना तसेच संबंधित जागेची सरकारी मोजणी झालेली नसताना संरक्षण भिंत बांधली जात असल्याने त्या बेकायदा कामाला राजकीय आशीर्वाद असावा असा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. ऋषिकेश जोशी यांनी केला आहे.

कर्जत शहरातून वाहत जाणाऱ्या उल्हास नदीच्या लागून आकुर्ले येथील बामचा मळा या ठिकाणी संरक्षण भिंत बांधली जात आहे. पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता संरक्षण भिंत बांधण्याचे कार्य सुरू आहे. कर्जत नगरपरिषद हद्दीत असलेल्या विभागातील ही कामे केली जात असताना कर्जत नगरपरिषदकडून त्या कामाकडे डोळेझाळ केली जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या महापूराला कर्जत शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागेल अशी भीती सामाजिक कार्यकर्ते ॲड. जोशी यांनी व्यक्त केली आहे. या भिंतीमुळे उल्हास नदीला महापूर आल्यानंतर पुराचे पाणी हे समोरच्या भागात जाऊन त्या परिसरात पाणीच पाणी होऊ शकते. समोरच्या बाजूला असलेल्या महावीर पेठ तसेच शनी मंदिर परिसराला पुराचा धोका संरक्षण भिंतीमुळे वाढला आहे.

दुसरीकडे ज्या भागात संरक्षण भिंत उल्हास नदीच्या तीरावर बांधली जात आहे. त्या जागेची रीतसर मोजणी भूमिअभिलेख कडून करण्यात आली नसल्याचा आरोप ॲड. जोशी यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेऊन ही संरक्षण भिंत तत्काळ तोडून टाकण्यात यावी अशी मागणी ॲड. जोशी यांनी केली आहे.

Exit mobile version