। रायगड । प्रतिनिधी ।
फेब्रुवारी संपताच यंदा उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून वातावरणात कमालीची उष्णता वाढली आहे. सध्या तापमान 37 अंशावर पोहोचले आहे. उन्हाच्या तडाख्याने अंगाची काहिली होत असून नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
सरकारी रुग्णालयांसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुसज्ज असा उष्माघात कक्ष तयार केला आहे.उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी थंडपेयांकडे नागरिकांचा अधिक कल वाढला आहे. आगामी काळात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. उन्हाची तीव्रता बघता नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे, सतत कुलर किंवा एसीच्या हवेत बसू नये. उष्माघाताची लक्षणे आढळून येताच आरोग्य कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा किंवा जवळच्या दवाखान्यात उपचार घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
उष्म्यापासून वाचण्यासाठी पाणी, लिंबू, कोकम, आवळा सरबत, कैरीचे पन्हं प्यावे. सकाळी 11.30 ते सायंकाळी पाचपर्यंत वातावरणात उष्मा अधिक असतो. त्यामुळे या वेळात वयोवृद्ध, लहान मुलांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी मनिषा विखे यांनी केले आहे. जिल्ह्यातील 55 प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. तेथे खाटांची व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. या ठिकाणी प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. दोन-तीन दिवसांत उपचार करूनही रुग्ण बरा होत नसल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात संदर्भीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना
आठवडाभरापूर्वी जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे आता तापमानाचा पारा आणखीनच वाढला आहे. महाड, माणगाव, पोलादपूर, पाटणूस, माथेरान, अलिबाग, कर्जत, खोपोलीमध्येही पारा 35 ते 38 सेल्सियसपर्यंत वाढला आहे. दिवसभर उन्हाचे चटके जाणवत असले तरी काही ठिकाणी पहाटे व रात्रीच्या वेळी गारवा जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या सर्दी, तापाची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात दररोज सुमारे 30 रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यासोबतच जिल्हा प्रशासनाकडूनही उष्णतेपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना सूचवल्या जात आहेत.