महागाईला बॅनरने फोडली वाचा
| पनवेल | वार्ताहर |
देशभरात सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना अधिक बसत आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारला याच्याशी काही देणे घेणे नसल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. त्यातच आता पनवेल-सायन महामार्गावरील एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. खिशात शिल्लक उरेना आता करु खर्चावर चर्चा, अशी टॅग लाईन असलेल्या बॅनवर उच्चांकी महागाईचा आलेख दर्शवण्यात आला आहे. सदरचा बॅनर कोणी लावला आहे. याची माहिती समोर आलेली नसली तरी हा बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
दैनंदिन जीवनातील लागणार्या विविध वस्तूंच्या वाढणार्या किंमतींनी सर्व सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पुरत कोसळले आहे. कितीही मेहनत केली तरी घर कसे चालवायचे हे त्यांना सुचत नाही. जीएसटीचा अर्थ काय आहे हे अजून सर्वसामान्य जनतेला तसेच मध्यम वर्गाला उमगलेला नाही. त्यातून समान्य माणसांचा खरच फायदा झाला का असे बोलके चित्र त्या माध्यमातून दिसत आहे.
दिल्लीमधून सादर होणार्या अर्थ संकल्पामध्ये फक्त घोषणांचाच पाऊस असल्याचे आता समोर आले आहे. सिलिंडरचा दर, पेट्रोल डिझेल ते गहू तांदूळ, ज्वारी, तेलाच्या किंमतींनी 2024 पर्यंत महागाईने उच्चांक गाठला आहे. या बॅनरच्या माध्यमातून किमती कशा वाढत गेल्या हे या बँनरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व सामान्य जनतेला काही घोषणा करून मोफत दिले त्याचा बोजा कोणावर पडतो. याचा विचार होणे गरजेचे आहे. श्रीमंता ज्या वस्तू वापरता अथला जी लाईफस्टाईल जगतात. त्यावर लावण्यात आलेला जीएसटी अतिशय कमी आहे, तर, सामान्यांसाठी आवश्यक असणार्या वस्तूंवर भरसाठ लावलेला जीएसटी या बॅनरच्या माध्यमातून तफावत दर्शवतो.