| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमधील पेठगावात राहणारी काजल पासवान (17) ही आपल्या घरातून बेपत्ता झाली होती. काजल हीचा मृतदेह गाढी नदीत सापडला आहे. आजारपणामुळे नैराश्येत आलेल्या या मुलीने गाढी नदीच्या पात्रात उडी टाकून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
मृत काजल पासवान पनवेलच्या पेठगांव येथे कुटुंबासह राहण्यास होती. काजल दहावीत दोन वेळा नापास झाल्याने 2022 पासून घरामध्येच होती. त्यानंतर ती नैराश्येत आल्याने तिच्यात चिडचिडेपणा वाढला होता. दरम्यानच्या काळात काजलच्या डोक्यात आणि पोटामध्ये गाठ असल्याचे तपासणीत आढळून आले होते. त्यामुळे तिला दोन वेळा रुग्णालयात उपचारासाठी दाखलदेखील करण्यात आले होते. या सर्व प्रकारामुळे काजल नैराश्येत आली होती. त्यामुळे आई घरामध्ये झोपली असताना, काजल घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिने गाढी नदीच्या पात्रात उडी टाकून आत्महत्या केली होती. काजल अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या आई-वडीलांनी तिची शोधाशोध केली. मात्र, ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरु केला होता. त्यावेळी गाढी नदीच्या किनारी काजलची चप्पलदेखील आढळून आली होती. त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने नदीपात्रात शोधदेखील घेतला होता. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. अखेर काजलचा मृतदेह नादंगाव येथील नवीन ब्रीजच्याखाली गाढी नदीत आढळून आल्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन तिचा मृतदेह ताब्यात घेतला.