विद्यार्थिनीची भरली फी, तर हिंदी विद्यालयात कोव्हिड लसीकरण
। खोपोली । प्रतिनिधी ।
इनरव्हील क्लब ऑफ खोपोली संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत शिशु मंदिर शाळेतील अनुष्का विचारे या गरजू विद्यार्थिनीची एका वर्षाची 10,200 रूपये संपूर्ण फी भरली. तर, हिंदी विद्यालयातील एकूण 35 विद्यार्थ्यांना मोफत कोव्हिड लसीकरण केले आहे.
महिलांची संघटना असलेली इनरव्हील क्लब ऑफ खोपोलीतर्फे सातत्याने अनेक समाजोपयोगी काम केली जात असतानाच नवनिर्वाचित अध्यक्ष सारिका धोत्रे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील अडचणींकडे विशेष लक्ष देत शिशू मंदिर इंग्रजी माध्यमात शिकणारी अनुष्का विचारे (8 वी) या विद्यार्थिनीची एका वर्षाची 10,200 रूपये संपूर्ण फीचा धनादेश मुख्याध्यापिका अध्यपन यांच्याकडे अध्यक्षा सारिका धोत्रे, मा. अध्यक्षा सुचिता जोशी, सेक्रेटरी जयश्री कलोशी, वर्षा शिवलकर यांनी सुपूर्द केला आहे.
शाळकरी सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यी अजूनही कोव्हिड लसीकरणापासून वंचित असल्यामुळे हिंदी विद्यालयात शिकणार्या 32 विद्यार्थ्यांना मोफत लसीकरण शनिवार, दि.23 जुलै रोजी माजी अध्यक्षा डॉ. रश्मी टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षा सारिका धोत्रे, सेक्रेटरी जयश्री कलोशी, सदस्या सुमिता महर्षी आणि हिंदी विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.
इनरव्हील क्लब ऑफ खोपोली संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबाबत शिशू मंदिर आणि हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.