रायगडातील समुद्रकिनारे गजबजले; पक्ष्यांची गर्दी पहायला अभ्यासकांचे तांडे
। पाली/गोमाशी । वार्ताहर।
थंडीच्या हंगामात हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होतात. या पक्ष्यांसाठी वातावरण अनुकूल झाले आहे. थंडीही चांगली पडू लागली असल्याने हे स्थलांतरीत व स्थानिक पक्षी स्थिरावले आहेत. विशेष म्हणजे येथील समुद्र किनार्यांवर स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षी अभ्यासक, निरीक्षक व पर्यटक सुखावले.
स्थलांतरित पक्ष्यांसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असल्याने स्थलांतरित पक्षी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने निसर्गरम्य रायगड जिल्ह्यात परदेशी स्थलांतरित पक्षी आणि काही स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. गवंतामधील कीटक व आळ्या खाण्यासाठी आणि साठलेल्या जलाशयामधील पाण्यातील कीटक, कृमी, मृदुकाय जीव-जंतू खाण्यासाठी तसेच समुद्र किनारे, दलदलीचे भाग यामधील छोटे खेकडे, मृदुकाय प्राणी, मासे, जल कीटक हे खाऊन पर्यावरणाचे संरक्षण व जैवविविधता समृद्ध करण्यात हे पक्षी महत्वाची भूमिका बजावत असतात. या पक्ष्यांचे दर्शन जिल्ह्यातील समुद्रकिनारे, दलदलीच्या जागा, जंगले, भातशेते, खाड्या तसेच गवताळ प्रदेशात होत आहे. परिणामी पक्षी अभ्यासक व निरीक्षकांना तसेच पर्यटकांना ही मोठी पर्वणीच आहे.
जगण्यासाठी प्रवास
उत्तर गोलार्धातील युरोप,रशिया आणि उत्तर अमेरिका यासारख्या देशात थंडीच्या दिवसात पडणार्या बर्फामुळे जमिनीवरील भूभाग हा बर्फाने आच्छादलेला असतो त्यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळणे कठीण होऊन जाते म्हणून हे पक्षी विविध देशात स्थलांतर करून आपली उपजीविका भागवतात. तसेच आपल्याकडे पडणारी थंडी आणि पुरेशा प्रमाणात मिळणारे खाद्य तसेच योग्य अधिवास या सर्व कारणांमुळे या पक्ष्यांना आपली घरटी बांधून पिल्लांचे संगोपन करणे सोपे जाते. म्हणून बर्याच स्थलांतरित पक्ष्यांचा विणीचा काळ सुद्धा हाच असतो.
समुद्रकिनारे गजबजले
जिल्ह्यात ऑगस्टच्या अखेरीपासून ते एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत हजारो किनारी पक्षी महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या पाणथळ प्रदेशात आणि वालुकामय किनार्यांवर येतात. भारतातील हिवाळी पक्षी मध्य आशियाई फ्लायवे वापरतात. येथील समुद्र किनारी प्रामुख्याने तुतवार, चिखल्या, कुरव, व्हिमब्रेल्स, लहान कोरल, युरेशिअन कोरल, सामान्य टीलवा, हिरवा तुतवार , पाणलावे , सुरय , समुद्री काळे बगळे आणि कालवफोडे आणि चिंबोरी खाऊ, रंगीत भाट तितर हे असामान्य पक्षी आहेत. पक्षी छायाचित्रकार या पक्षी हालचालींच्या कृती छायाचित्रबद्ध करण्याच्या संधीचा आनंद घेतात.
स्थानिक पक्ष्यांचे आगमन
पॅराडाईज फ्लाय कॅचेर ( स्वर्गीय नर्तक), इंडियन रोलर (भारतीय तास पक्षी), श्राईक (खाटीक), युरेशियन हुपू (हुदहुद), क्रेस्टेड बंटीग (युवराज)
परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचा बोलबाला
ब्ल्यू थ्रोट (शंकर) युरोपियन रोलर (तास पक्षी), युरेशियन रायनेक (मानमोडी) सायबेरियन स्टोनचाट (गप्पीदास पक्षी) , बंटिंग्स (भारीट पक्षी), पॅलिड हॅरिअर (पांढूरका भोवत्या)
रायगड जिल्ह्यात 400 हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद आहे. स्थलांतरित पक्षांसाठी येथे अनेक प्रकारचे पोषक नैसर्गिक अधिवास आहेत. त्यामुळे चांगल्या संख्येने पक्षी दाखल होतात. समुद्रकिनारे, पाणथळीचे प्रदेश, घनदाट जंगले, माळराने अशा अधिवासांमध्ये विविध प्रकारच्या पक्षी प्रजाती जिल्ह्यात थंडीच्या मोसमात येतात. पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी ही गुलाबी थंडी पर्वणीच असते.
शंतनु कुवेसकर,
वन्यजीव अभ्यासक, माणगाव