हंडा मोर्चा काढण्याचा इशारा
। वावोशी । वार्ताहर ।
वावोशी गावातील महिलांचा संताप उफाळून आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असलेल्या जलजीवन योजनेचे काम अद्याप अपूर्ण असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी असून या कामाच्या विलंबामुळे महिलांनी थेट ग्रामपंचायतीला घेराव घालून जोरदार आंदोलन केले.
ग्रामपंचायत कार्यकारिणी जेव्हा खुर्चीवर आरूढ झाली, तेव्हा वावोशी गावातील महिलेचा डोक्यावरील हंडा खाली आणून त्यांना घरोघर नळाद्वारे पाणी दिले जाईल आणि गावाचे नंदनवन केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आज अडीच वर्षे व्हायला आली तरी गावाचे नंदनवन सोडा साधा पाण्याचा तपासदेखील नाही अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या.
वावोशी पासून विभक्त झालेल्या शिरवली, होराळे, गोरठण ग्रामपंचायतीमध्ये नवनवीन सुधारणा झाल्या. त्यांच्या गावातील जलजीवन योजना पूर्ण झाल्या व घरोघरी नळाला पाणीदेखील यायला लागले. पण आम्हाला मात्र आजही पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे. शेजारच्या गावांसोबत आमच्या गावाला देखील जलजीवन योजना मंजूर झाली असून त्या गावांतील जलजीवन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधून त्यांना पाणीदेखील मिळायला लागले आहे. पण आमची जलजीवन योजना कुठे अडकली आहे? आम्हाला यावर्षी देखील पाणी प्यायला मिळणार आहे की नाही? असा संतप्त सवाल महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केला आहे. फेब्रुवारी महिना आला की पाण्याची पातळी कमी होते आणि पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आम्ही टँकरचे पाणी प्यायचे का? अशा संतप्त प्रतिक्रियांचा उद्रेक महिलांमधून बाहेर पडत होता.
यावेळी वावोशीच्या सरपंच अश्विनी शहासने यांनी खुलासा करताना सांगितले की, या योजनेच्या पाण्याच्या टाकीसाठी वनविभागाकडून परवानगी मिळालेली नाही. संबंधित परवानगी देण्याचे काम अलिबाग येथील वनविभागाकडे प्रलंबित आहे. ठेकेदारांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनीही याच कारणामुळे काम थांबले असल्याचे स्पष्ट केले. वावोशीमधील संतप्त झालेल्या महिलांनी मात्र ग्रामपंचायतीला धारेवर धरत, आम्हाला कारणे नकोत, काम पूर्ण होणे आवश्यक आहे, असे ठणकावून सांगितले. त्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, जलजीवन योजनेतील पाणी येत्या मे महिन्यापर्यंत मिळाले नाही, तर पंचायत समिती कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढण्यात येईल. आणि तिथेही जर न्याय मिळाला नाही तर आम्ही थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढू,असा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे. महिलांच्या या तीव्र संतापाने ग्रामपंचायत कार्यकारिणीला चांगलाच धक्का बसला असून, या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासन, ठेकेदार आणि वनविभाग यांच्यातील समन्वयाची कमतरता समोर आली आहे.
जलजीवन योजनेच्या पाण्याच्या टाकीसाठी वनविभागाकडून परवानगी मिळालेली नाही. संबंधित परवानगी देण्याचे काम अलिबाग येथील वनविभागाकडे अंतिम टप्प्यात आले असून वनविभागाकडून परवानगी मिळताच कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
अश्विनी शहासने,
सरपंच, वावोशी ग्रामपंचायत