। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील पर्यटकांची फसवणूक करून त्यांना ज्याप्रकारे अप्रत्यक्षपणे त्रासाला सामोरे जावे लागते, त्याबद्दल दिवसेंदिवस प्रसार माध्यमांवरून, सोशल मीडियावर पर्यटकांकडून देण्यात येणार्या पोस्ट पाहता माथेरानची प्रतिमा मलिन होत असून, प्रामुख्याने इथे काय बदल करावा लागेल जेणेकरून येणारा पर्यटक सुरक्षितपणे, आनंदाने आपल्या नियोजित हॉटेल, लोजिंगपर्यंत पोहोचू शकतो यासाठी आवश्यक असणार्या उपाययोजना केल्यास याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढून सर्वांनाच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
बाराही महिने हे पर्यटनस्थळ पर्यटकांनी बहरून निघेल याकामी राजकीय पक्षांची तसेच व्यापारी वर्ग आणि विविध सामाजिक संस्था यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि या सर्व गोष्टी करताना सुरुवातीला काही प्रमाणात अडचणी निर्माण होणार हे माहीत असताना जी काही माथेरानवर प्रेम करणारी इथल्या सर्वसामान्य लोकांचा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, भावी पिढीला इथे सन्मानाने जीवन जगता यावे सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाला आधार देता यावा यासाठी काही राजकीय पक्षांची, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन इथे पर्यटन क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तर काही राजकीय पक्षांची मंडळी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि नगरपरिषदेच्या सभागृहात स्थान मिळविण्यासाठी तत्परता दाखवत आहेत.
अशा राजकीय पक्षांच्या नेत्यांना या गावाविषयी काहीएक सहानुभूती नसून आपण सभागृहात जाऊन नगरपरिषदेच्या तिजोरीवर डल्ला मारून पुढच्या पिढीसाठी आर्थिक जमापुंजी साठवणूक करायची हाच एकमेव दृष्टिकोन ठेऊन पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत नेहमीप्रमाणे दुटप्पीपणा करून गावाच्या हितावह बाबींकडे पाठ करून मूठभर मतांसाठी विरोधकांना पाठिशी घालून माथेरानच्या विकास कामांवर कुर्हाडीचा घाव घालताना दिसत आहेत.