मतदारांकडून उत्स्फूर्त पाठिंबा
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि.7) मतदान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रचारसभा, रॅली आणि विविध संपर्क अभियानांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या 19 उमेदवारांसह महाविकास आघाडीचे एकूण 47 उमेदवार रिंगणात उभे आहेत. तळागाळातील घटक, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि तरुण वर्गांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिल्यामुळे या निवडणुकीत शेकापसह महाविकास आघाडीला बलाबल मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, महायुतीमधील शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंतर्गत पायखेची सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तसेच मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी या पक्षांचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत.
स्थानिक प्रश्न, भूमीपुत्रांना न्याय, तसेच भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेत महाविकास आघाडी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. विकासकामे न करता ती केल्याचा देखावा करून बिले काढल्याचे, तसेच निधीची अक्षम्य लूट झाल्याचे आरोप करत महाविकास आघाडीने प्रचारात मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे शिंदे गटासह महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे 19, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 19 आणि काँग्रेसचे 9 असे एकूण 47 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने 19 उमेदवार उभे केले असून त्यात पनवेलमध्ये सहा, अलिबागमध्ये पाच, पेणमध्ये दोन, तसेच सुधागड, रोहा, तळा, म्हसळा आणि श्रीवर्धनमध्ये प्रत्येकी एक उमेदवार आहे.
पनवेल तालुक्यातील वावंजे जिल्हा परिषद मतदार संघातून लता धनराज म्हात्रे, नेरेमधून मारुती बाळू भस्मा, पाली देवदमधून डॉ. ज्योती स्वप्नील भुजंग, पळस्पेमधून अस्मिता अनिल ढवळे, वडघरमधून ज्योती जनार्दन चोरघे, केळवणेमधून ज्ञानेश्वर हसुराम मोरे हे उमेदवार उभे आहेत. सुधागड तालुक्यातील वीस राबगाव जिल्हा परिषद मतदार संघातून काशिराम ताया हंबीर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पेण तालुक्यातील दादर जिल्हा परिषद मतदार संघातून प्रल्हाद दिनेश पाटील, वडखळमधून संजय जनार्दन जांभळे हे उमेदवार उभे राहिले आहेत.
अलिबाग तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद मतदार संघातून अभिषेक अनिल पाटील, आंबेपूरमधून पुजा अजित भगत, थळमधून सानिका सुरेश घरत, चेंढरेमधून प्रविणा प्रमोद घासे, कावीरमधून मोहन दत्तात्रेय धुमाळ हे उमेदवार रिंगणात आहेत. रोहा तालुक्यातील घोसाळेमधून वैष्णवी हेमंत ठाकूर, तळा तालुक्यातील चरई खुर्दमधून करुणा कमलेश पातेरे, म्हसळा तालुक्यातील पाभरे जिल्हा परिषद मतदार संघातून संतोष नथुराम पाटील, तर श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतनमधून शारदा देवजी नाईक हे उमेदवार असल्याची माहिती देण्यात आली आहे.





