। चिपळूण । प्रतिनिधी ।
सुनेवर छाती आणि पोटात सुरीने सपासप वार करून तिला ठार मारल्याप्रकरणी सासूला चिपळूण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तालुक्यातील वालोपे देऊळवाडी येथे ही घटना 29 एप्रिल 2017 मध्ये घडली होती. परी प्रशांत करकाळे (वय 25) या विवाहितेचा मृत्यू झाला होता. आरोपी सासू रेणुका नामदेव करकाळे (55) हिला शिक्षा ठोठावली. या घटनेत दोघांची साक्ष महत्त्वाची ठरली.
परी यांचा 2012 च्या सुमारास प्रशांत करकाळेसोबत विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर घरात कौटुंबिक वाद सुरू झाले. सासू-सुनेमध्ये सतत वाद होत असत. परी करकाळे यांना 2017 मध्ये दोन मुले होती. घरातील सासू व सुनेतील वाद मिटण्यासाठी वारंवार बैठका झाल्या तरी वाद थांबले नाहीत. 29 एप्रिल 2017 ला रेणुका नामदेव करकाळे आणि परी प्रशांत करकाळे यांच्यातील वाद विकोपाला गेला. सकाळी साडेनऊच्या सुमारास रेणुका करकाळे हिने सुरीने सून परी हिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. छातीत तसेच पोटात तब्बल 36 वार करीत तिला भोसकून ठार मारले. आईला आपली आजी मारत असल्याने पाहून ही माहिती तीन वर्षीय मुलाने शेजार्यांना सांगितली. शेजारी घरी आले तेव्हा परी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
या घटनेची माहिती वालोपेचे पोलिसपाटील बाळकृष्ण भिकू कदम यांनी दिली होती. त्यानुसार रेणुका नामदेव करकाळे हिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल विनायक मधुकर चव्हाण, वेदा संतोष मोरे यांनी वेगाने तपास केला होता. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी (ता. 29) या गुन्ह्याचा निकाल लागला आहे. या घटनेत एकूण 15 सरकारी साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये स्मिता शैलेंद्र मयेकर व अजय कदम या दोघांची साक्ष खूप महत्त्वाची ठरली आहे. सरकारी वकील म्हणून पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी रेणुका करकाळे हिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. या सोबतच 10 हजारांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली.